पालघर : खेलो इंडिया या योजनेतून देशामध्ये एक हजार खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येणार असून त्याअंतर्गत पालघर जिल्ह्यासाठी बॉक्सींग प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रामधून दर्जेदार गुणवंत खेळाडू घडतील असा विश्वास सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. खेलो इंडिया बॉक्सींग प्रशिक्षण केंद्रातल्या अद्यावत बॉक्सींग रिंगचं उद्घाटन सोमवारी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी खेळाडुंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्तम प्रशिक्षक आवश्यक असतात. तसचं उत्तम दर्जाचा आहार आवश्यक असतो. खेलो इंडियाच्या माध्यमातून या प्रशिक्षण केंद्रातून या सर्व बाबी पुरविल्या जाणार असल्याचं चव्हाण म्हणाले. खेळाडू घडविण्यासाठी जिल्ह्यातल्या उद्योजकांनी देखील हातभार लावून उत्तम खेळाडू घडविण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन ही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केलं. यावेळी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी गोविंद बोडके आदी उपस्थित होते.