पालघर : साहित्य हे मानवी जीवनाच्या उत्थानासाठी अत्यंत आवश्यक असून साहित्य मानवी जगण्याला समृद्धी देते असे प्रतिपादन लेखिका दिपा देशमुख यांनी केले. पालघर ग्रंथोत्सव-२०२२ मध्ये आयोजित केलेल्या “माझा लेखन प्रवास” या परिसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी यांनी त्यांच्या लेखन प्रवासाचा आढावा घेतला. मी लिहीलेले साहित्य, त्यासाठी जगभरातल्या मान्यवरांशी झालेला परिचय हा मला समृध्द करतो, असे विवेचन त्यांनी केले. ग्रंथांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी तसेच विविध ग्रंथांचे वितरक आणि वाचक यांच्यातील दरी कमी व्हावी यासाठी पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर ग्रंथोत्सव-२०२२ चे आयोजन करण्यात आले होते.
पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. उज्वला काळे आणि प्रा. अशोक ठाकूर यांच्या हस्ते ग्रंथदिंडीची सुरुवात झाली. स.तु. कदम विद्यालय, नूतन विद्यामंदिर आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. यावेळी उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी आपल्या लहानपणीच्या वाचनांच्या सवयींना उजाळा दिला. विशेष अतिथी उज्वला काळे यांनी माणसाच्या आयुष्यातील ग्रंथांचे महत्व सांगत येत्या काळात पालघर शहरात बंद पडलेली ग्रंथालये पुनर्जीवित करण्याचा आणि पाडया-पाडयामध्ये छोटी ग्रंथालये सुरु करण्याचा मानस व्यक्त केला. डिंपल प्रकाशनचे अशोक मुळ्ये यांनी प्रकाशन संस्था यांचे वर्तमान मांडले आणि ग्रंथोत्सवाचे कौतुक केले. यावेळी संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर आणि प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभाचे आभार राज्य ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष दिलीप कोरे यांनी मानले. सुत्रसंचालन अना पाध्ये- देशमुख आणि सुप्रिया राऊत यांनी केले.
समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव पाहता त्यावर चर्चा व्हावी म्हणून ‘समाजमाध्यमांचा वाचक चळवळीतील परिणाम’ या विषया वरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे अध्यक्ष स्थान नंदा मेश्राम यांनी भूषविले. तसचं यावेळी प्राचार्य डॉ. किरण सावे, सॅबी परेरा, अपर्णा पाडगांवकर यांनी आपले विचार मांडले. या सत्राचे सुत्रसंचालन अश्विनी भोईर यांनी केले. गेल्या ७५ वर्षातील मराठी साहित्याचे योगदान या परिसंवादात प्रा. विवेक कुड़ यांनी ७५ वर्षातील कवितेच्या योगदानाचा विस्तृत आढावा घेतला. मनोज आचार्य यांनी चरित्र वाचनाचे महत्व सांगून काही निवडक चरित्रांचे संदर्भ दिले. कवि संमेलनात सखाराम डाखोरे, विजय ठाकूर, विजय पुरव, संतोष सखे, उमेश कवळे, शिल्पा परुळेकर, संगीता पाटील, योगेश गोतारणे, शबाना व्हीक्टर, प्रिती भोईर, रुपाली ठाकुर, प्रविण पाटील, प्रकाश पाटील, संजय पाटील यांनी आपापल्या कविता सादर केल्या. कवि संमेलनाचे सुत्रसंचालन हे सुषमा राऊत यानी केले.
या ग्रंथोत्सवात मनोविकास, कोमल, प्रतीक, राजा, कृष्णा आणि डिंपल आदी प्रकाशकांनी आपल्या ग्रंथाचे प्रदर्शन मांडले होते. गेल्या ७५ वर्षांतील महत्वाच्या ग्रंथांचे प्रदर्शन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालयात भरविले होते. हा ग्रंथोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील कला शाखेतील शिक्षक तसेच प्रा. विवेक कडू, ग्रंथपाल डॉ. शीला गोडबोले, संजय बनसोडे यांनी विशेष मेहनत घेतली. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील यांनी या ग्रंथोत्सवाच्या संयोजनाची जबाबदारी पार पाडली.