पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या ऐनशेत या गावात काही स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसून आल्यानं इथं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. गावात बिबट्या दिसून आल्याची माहिती गावक-यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर डहाणु वनविभागाच्या भरारी पथकाला इथं तैनात करण्यात आलं आहे. आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गावात लावण्यात आलेल्या सीसीटीवी कैम-यात देखील या पथकाला बिबट्या दिसून आला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली आहे.
या बिबट्यानं रात्रीच्यावेळी एका कोंबड्याची शिकार केली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी डहाणू वन्यजीव संवर्धन व अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन आणि वनविभाच्या माध्यमातून गावात दोन पिंजरे आणि सीसीटीवी कैमरे लावण्यात आले आहेत. ही टीम ट्रप लावून बिबट्याचा शोध घेत आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन ही वनविभानं केलं आहे.