पालघर : पूर्वी आपल्याकडे असलेल्या स्किलमुळे आपण जगात खूप पुढे होतो, त्यामुळे आताच्या विद्यार्थ्यांना स्कील बेस शिक्षण देणं हे गरजेचं असल्याचं मत शैक्षणिक धोरण अभ्यासक आनंद मापुस्कर यांनी व्यक्त केलं. पालघर जिल्ह्यातल्या विरार मधल्या विवा महाविद्यालयात आज लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर एकसष्ठीपूर्ती गौरव समिती आणि विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने – संधी – आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर आधारित या परिसंवादात संचालक तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य डॉ.अभय वाघ, माजी प्र-कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉ.रवींद्र कुलकर्णी, माजी चेअरमन अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद नवी दिल्ली डॉ. एस मंथा, शैक्षणिक धोरण अभ्यासक आंनद मापूरस्कर आदींनी विविध मुद्द्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
शाळांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम कमी करून मुलांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग वाढवून चांगल्या पद्धतीनं शिकवल्यास मुलांचा योग्य विकास होवू असं मत आपल्या मार्गदर्शनपर सत्रात मापूरस्कर यांनी व्यक्त केलं. तसचं शैक्षणिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज का आहे, शिक्षणाच्या पद्धतींमध्ये – शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल केले पाहिजेत, आपल्या शिक्षणाची नेमकी उद्दिष्ट काय आहेत अशा अनेक विषयांवर शैक्षणिक धोरण अभ्यासक आनंद मापुस्कर यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केलं. ऍकॅडमीक बॅंक्स ऑफ क्रेडिट्स, मल्टिपॉईंट एन्ट्री ऍण्ड एक्सिट, पर्सनालाईझ एज्युकेशन, आणि लाईफलॉंग लर्निंग हे सर्व ही मुद्दे विद्यार्थ्यांसाठी, सोसायटीसाठी महत्वाचे असू शकतील, ऍकॅडमीक बॅंक्स ऑफ क्रेडिट्स मध्ये एक – दोन वर्षात मुलं चांगलं शिक्षण घेऊन बाहेर जाऊन काम करू शकतात आणि आपली फायनान्शियल स्थिती सुधारू शकतात असं मत माजी चेअरमन अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद नवी दिल्ली डॉ. एस मंथा यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी शिक्षण कसं नसावं या विषयावर देखील मुबंई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं.
यावेळी उपस्थितांच्या विविध प्रश्नांवर देखील मागदर्शकांनी चर्चा केली. या परिसंवादात विद्यार्थी, विविध शाळांमधून आलेले शिक्षक, प्राचार्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते.