पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार मध्ये आज वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे दहाव्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉन स्पर्धेत लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीचं मोठ्या स्फुर्तींनं सहभाग घेतला होता. यंदा या दहाव्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असलेले कॉमनवेल्थ गेम्स आणि आशिया चॅम्पीयनशिप रौप्य पदक विजेते अविनाश साबळे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाली.
कोरोना काळानंतर पहिल्यांदाचं वसई विरार महानगरपालिकेची ही दहावी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज संपन्न झाली. या दहाव्या राष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये वसई – विरार शहरासह पालघर, मुंबई आणि डेहराडून , मेघालय, युपी, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र अशा जवळपास नऊ राज्यांतुन तीन हजारांहुन अधिक संख्येनं स्पर्धक सहभागी झाले होते. या मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन महिला आणि पुरुष गट, 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन महिला आणि पुरुष गट, 11 किलोमीटरची टाईम रन, 2,3 आणि 5 किलोमीटरची तसचं 60 पेक्षा जास्त वय असलेल्या महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगळा गट, फन रन असे वेगवेगळे गट करण्यात आले होते.
पहा व्हिडिओ ……..
या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात ही नवीन विवा कॉलेज इथून झाली आणि ती समाप्त ही जुन्या विवा कॉलेज इथे झाली. या मॅरेथॉन मध्ये लहान मुला-मुलींपासून ते अगदी 72,75 आणि 82 वर्ष असलेल्या वयोवृद्धांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे भाग घेतला. विशेष म्हणजे या मॅरेथॉन मध्ये महिलांचा सहभाग मोठ्यासंख्येनं पहावयास मिळाला. आणि या स्पर्धकांचं मनोबल अधिक वाढवण्यासाठी यावेळी मराठी कलाकार, साईबाबा या मालिकेतील अभिनेते तसचं हास्य जत्रा या मराठी कोमेडी कार्यक्रमातील अभिनेते समीर चौगुले आणि त्यांचे टीम मेंबर उपस्थित होते.
या मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटर फुल मॅरेथॉन पुरुष गटात पुणे आर्मी इन्स्टिटय़ूट स्पोर्ट्स विभागातल्या मोहित राठोड यांनी 2 तास 18 मिनिट 08 सेकंदात 42 किलोमीटर पार करत पहिल्या क्रमांक पटकावला. तसचं त्यापाठोपाठ अर्जुन प्रधान, अनिस थापा यांनी प्रत्येकी दुसरा आणि तीसरा क्रमांक पटकावला. यावेळी सर्व गटात पहिला,दुसरा आणि तीसरा क्रमांक पटकावणा-या विजेत्यांना काही रोख रक्कम आणि मेडल बक्षिस रुपात देण्यात आली.
यावेळी विजया नंतर प्रतिक्रिया देताना मोहित राठोड म्हणाले की, वसई- विरार मध्ये भाग घेतलेली ही माझी दूसरी मॅरेथॉन आहे. यापुढे चांगला सरावं करणं आणि ओलम्पिक क्वालीफाईड करणं हे माझं ध्येय आहे.