पालघर : कोणत्याही संशोधनात नाविन्यपूर्णता असली पाहीजे आणि ते संशोधन समाजोपयोगी, समाजाभिमुख असले पाहीजे. गरज ही शोधाची जननी आहे हा शोध घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अथक मेहनत घेतली पाहीजे असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी केलं. पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या झोन-५ च्या १७ व्या आविष्कार संशोधन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या स्पर्धेत संशोधनाच्या सहा गटात चौदा महाविद्यालयातल्या ३०५ विद्यार्थी संशोधकांनी १२५ संशोधन प्रकल्प सादर केले.
या स्पर्धेत शेती, तंत्रज्ञान, भाषा, विविध दुर्लक्षित समाज, कोरोना काळाच्या नंतरचं आरोग्य या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले संशोधन सादर केलं. या आविष्कार संशोधन स्पर्धेत सोनोपंत दांडेकर महाविद्यालयानं सर्वाधिक बारा बक्षिसे मिळवत झोन-५ वर आपला ठसा उमटवला. तर विवा महाविद्यालयानं सात पारितोषिके पटकावीत द्वितीय स्थान मिळवलं. तसचं अभियांत्रिकी सदरातील पारितोषिके ही सिल्वासाच्या देवकीबा महाविद्यालयाने पटकाविली.
वसई-विरार मध्ये दहाव्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन
तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार आहात, आपल्या क्षमता ताकदीने वापरल्या तर यश हे नक्की ठरलेले असते असं मत यावेळी प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी व्यक्त केलं. आविष्कार, संशोधन नसते तर आपण आदिम राहीलो असतो असं मनोगत संस्थेचे कोषाध्यक्ष हितेंद्र शहा यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी गरवारे इस्टीट्युटचे संचालक डॉ. केयूरकुमार नायक यांनी विद्यार्थ्यांनी केवळ उद्योगधंद्याच्या बाबतीत स्थानिक पातळीचा विचार करु नये तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा समन्वयक दिपा वर्मा यांनी केले. तसचं कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हे कॅप्टन अनघा-देशमुख यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन स्तरावर आविष्कार समन्वयक म्हणून डॉ. सपना जाधव यांनी तर उपजिल्हा समन्वयक म्हणून डॉ. मनिष देशमुख यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी उपप्राचार्य प्रा.महेश देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.