पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू शहरात पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा Minister of Public Works, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळयाला महिला आणि बालविकास व अल्पसंख्याक व्यवहार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या.
घर तिथे नळ ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे असं पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान कर संकलन केंद्राचं, जेष्ठ नागरिकांसाठीच्या खुल्या वाचनालयाचं आणि मोफत वायफाय सेवेचं उदघाटन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं.
पूर्वी डहाणू शहरात नगरपरिषदेकडून 7.2 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येत होता. मात्र आता वाढीव पाणी पुरवठा योजनेतून जलशुद्धिकरण केंद्राची 2 एमएलडी क्षमता वाढवण्यात आली आहे. म्हणजे जवळपास 9.2 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रातून आता नागरिकांना दिवसातून दोन तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 35 कोटी 41 लाखांचा खर्च आला आहे. याचा लाभ डहाणू नगरपरिषद क्षेत्रात रहणा-या 70 ते 80 हजार नागरिकांना होणार असून २०२४ पर्यंत तरी इथल्या नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही अशी माहिती यावेळी डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी दिली.
238 दिव्यांग लाभार्थ्यांना, ऑन ड्युटी रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या डहाणू नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 – 5 लाखांची मदत तसचं खुल्या वाचनालयासाठी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. डहाणू नगरपरिषद क्षेत्रातल्या 10 ते 12 स्पॉटवर मोफत वायफाय सेवेचा शुभारंभ देखील यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.