पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कामकाजात मतदान केंद्रावर नियुक्त केलं असताना ही गैरहजर राहिल्यानं लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार जिल्हा परिषदेच्या आठ शिक्षिका, दोन शिक्षक आणि एक शाखा अभियंता अशा एकूण ११ लोकसेवकांविरोधात पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
पालघर जिल्ह्यातल्या एकूण चार तालुक्यांत 63 ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबरला पार पडल्या. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस अगोदर आपापल्या मतदान केंद्राचा ताबा घेण्यासाठी सर्व साहित्य वाटप करण्यात येत असताना पालघर जिल्हा परिषद अंतर्गत दहा शिक्षक आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा एक शाखा अभियंता असे एकूण ११ जण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा लेखी पत्र न देता गैरहजर राहिले होते.
अनुपस्थित राहिलेल्या लोकसेवकांविरुद्ध निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नायब तहसीलदार केशव तरंगे यांच्या तक्रारीवरून पालघर पोलिसांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता एल. आर. सोनोग्रा, जिल्हा परिषद शाळा हालोली, कातकरीपाडा येथील शिक्षक पराग प्रदीप संखे, मनोर केंद्रातील मुकलेपाडा येथील शिक्षिका प्रीती बोकंद, वेवूर शाळेच्या शिक्षिका शीतल संखे, प्रतिभा संखे, नंडोरे शाळेतील शिक्षिका प्रेरणा राणे, किराट शाळेच्या शिक्षिका सुजाता वाडे, चिल्हार शाळेचे शिक्षक विलास तुंबडा, गिरनोली (खुताडपाडा) शाळेच्या स्मिता तरवाल, पारगाव शाळेच्या शिक्षिका प्रमोदिनी पाटील, शिगाव शाळेच्या शिक्षिका विनिता संखे यांच्याविरोधात पालघर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल केला आहे.
निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावर नियुक्ती केलेली असताना निवडणुकीच्या कामांमध्ये टाळाटाळ करून मतदान केंद्रावर अनुपस्थित राहिल्याचा ठपका ठेवून या सर्वांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.