पालघर : आगामी पोलीस शिपाई भरतीच्या अनुषंगानं पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून चालू असलेल्या जनसंवाद अभियाना अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या तरुणांना पोलीस भरती प्रक्रियेविषयीची माहिती मिळावी यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं.
पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यानं पोलीस भरती विषयी स्थानिक तरुणांना माहिती नसल्यानं तसचं जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावं हा या जनसंवाद अभियान उपक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या शिबीरा मागचा मुख्य उद्देश होता. या अभियानात जिल्ह्यातले जवळपास ४५० उमेदवार सहभागी झाले होते.
पोलीस दलात भरती होण्यासाठी उमेदवारांना मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा चाचणी अशा प्रकारच्या प्रक्रियेतून जावं लागतं, त्याअनुषंगानं भरतीसाठी लागणारे कागदपत्र, मैदानी चाचणीतील प्रकार आणि लेखी परीक्षेची तयारी याविषयी या शिबीरात उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी उपस्थित सर्व उमेदवार यांना पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ, पोलीस उपअधीक्षक (गृह) शैलेश काळे आदींनी बहुमुल्य मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.