पालघर : सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दस्ताने काबुल या हिंदी मालिकेची अभिनेत्री तुनीषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात वालीव पोलिसांनी तिचा को ऍक्टर शिजान खानला अटक करून रविवारी वसई न्यायालयात हजर केलं असता वसई न्यायालयानं शिजान खानला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला वालीव पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून पोलीस या प्रकणात संबधित सर्वांची चौकशी करत आहेत.
शनिवारी पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यामधल्या कामण भागातल्या भजनलाल स्टुडिओत सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दस्ताने काबुल या हिंदी मालिकेच्या सेटवरील एका रूम मध्ये अलिबाबा दस्ताने काबुल या हिंदी मालिकेत मरियम ची भूमिका साकारणाऱ्या तुनीषा शर्मानं शूटिंगच्या सेट वरील मेकअप रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. रात्री उशिरा तिच्या आई वनिता शर्मा यांनी वालीव पोलीस ठाण्यात तिचा को ऍक्टर शिजान खान यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. तिच्या आईने केलेल्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी शिजान खान विरुद्ध वालीव पोलीस ठाण्यात कलम 306 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आणि आज रविवारी त्याला वसई न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने शिजान खान ला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तुळींज सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की, मरियम ची भूमिका करणारी अभिनेत्री तुनीषा शर्मा आणि अलिबाबा ची भूमिका साकारणारा शिनाज खान या दोघांमध्ये प्रेमप्रसंग सुरू होते. मात्र गेल्या 15 दिवसांपासून दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता. त्या नैराश्यातुन या अभिनेत्रीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं जाधव यांनी सांगितलं. शवविच्छेदनाच्या रिपोर्ट मध्ये सुद्धा या अभिनेचा मृत्यू हा गळफासाने झाला असल्याचं स्पष्ट झालं असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली .
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तुनीषा ही शनिवारी सिरीयलच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. त्यानंतर तिचे सहकारी तिला बोलावण्यासाठी गेले असता दरवाजा ठोठाऊन सुद्धा तिने दरवाजा न उघडल्यानं दरवाजा तोडण्यात आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचं पाहून सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. त्यांनतर तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. पोलिसांनी तिचे शव हे शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते.