पालघर : पालघरच्या महावितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता किरण हरीश नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये या दोन अधिका-यांना एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकानं रंगे हात पकडून अटक केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्याच विभागातल्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध दोन-तीन तक्रारी महावितरण विभागात दाखल असून त्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये यासाठी या दोघांनीही त्याच्याकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडी नंतर ही रक्कम दीड लाख रूपये इतकी करण्यात आली. यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे याविषयी तक्रार दिली. या तक्रारीची शहनिशा आणि पडताळणी झाल्यानंतर पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक नवनाथ जगताप आणि त्यांच्या पथकानं महावितरण कार्यालयात सापळा रचून तडजोडीअंती ठरलेल्या रक्कमेपैकी एक लाख रुपयांची रोख रकमेची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकानं या दोन्ही अधिका-यांना रंगेहात अटक केली आहे.
पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलिस कर्मचारी अमित चव्हाण, विलास भोये, नितीन पागधरे, निशा मांजरेकर, दिपक सुमडा सखाराम दोडे, स्वाती तारवी या पथकानं ही कारवाई केली आहे.