पालघर : महावितरणचे कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांच्या विविध संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून 4, 5 आणि 6 जानेवारी असे दिवस ७२ तासांच्या संपावर जात आहेत. या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातल्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातल्या वसई आणि पालघर या मंडल कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. संपाच्या कालावधीत वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान अथवा अपघात यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसचं कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपात नसणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठीच्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगानं काही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. त्यात वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा भागाचा समावेश असलेल्या वसई मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षासाठी 7875760601 आणि 7875760602 हे संपर्क क्रमांक आणि पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा आणि विक्रमगडचा समावेश असलेल्या पालघर मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षासाठी 9028005994 आणि 9028154278 हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आहेत. संप कालावधीत नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक चोवीस तास सुरू राहणार असून वीजेसंदर्भातील तक्रारी आणि माहिती देण्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.