पालघर : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ( Savitribai Phule Jayanti ) क्रांतीज्योती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तर्फे मंगळवारी पालघर पंचायत समिती सभागृहात विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांना सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आलं.
गेल्या नऊ वर्षांपासून निलेश भोईर यांचं क्रांतीज्योती प्रतिष्ठान हे विविध कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करत आलं आहे. यंदा दहाव्या वर्षी देखील क्रांतीज्योती प्रतिष्ठानच्या निलेश भोईर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजातल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जवळपास 20 कर्तृत्ववान महिलांच्या कामाची दखल घेत त्यांना सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी काही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील या प्रतिष्ठान तर्फे करण्यात आलं.
यावेळी पालघरच्या प्रा. आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत, पालघर पंचायत समिती सभापती शैला कोलेकर, प्रमोद पाटील, क्रांतीज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भोईर, सचिव संघमित्रा भोईर आदी उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याला महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता.