पालघर : पालघर जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे यासाठी शासन प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केलं. प्रथमतःच पालघरला राज्यस्तरीय हँडबॉल आणि बॉक्सिंग स्पर्धांचे यजमानपद प्राप्त झालं आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. पालघर जिल्ह्याला प्रथमतः या स्पर्धांचा मान मिळाल्याचा अभिमान असल्याचे जिल्हाधिकारी बोडके यांनी यावेळी आवर्जून सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करून हे क्रीडा संकुल सुसज्ज करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात हे क्रीडा संकुल क्रीडा विश्वात मॉडेल ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या दोन दिवसीय राज्यस्तरीय हँडबॉल आणि बॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात आलं आहे. राज्यभरातल्या आठ विभागासह क्रीडा प्रबोधिनी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दोनवेळा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जिम्नॅस्टिक क्रीडा मार्गदर्शक आणि खेळाडू वर्षा उपाध्याय यांचा विशेष सत्कार यावेळी जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हँडबॉल मैदानाचे पूजन करून नागपूर विरुद्ध पुणे आणि अमरावती विरुद्ध नाशिक या हँडबॉल स्पर्धांची सुरुवात आज करण्यात आली. तसचं जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी खेलो इंडियाच्या बॉक्सिंग रिंग मध्ये देवांग महागावकर विरुद्ध तेजस गोडसे या बॉक्सिंग खेळाडूंच्या सामन्याची सुरुवात करून दिली. यावेळी उद्घाटन सोहळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रीमियर रीदमिक जिम्नॅस्टिक अकॅडमी मार्फत रोमहर्षक आणि थरारक रिदमिक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारांचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. या प्रत्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. १४ ते १९ वयोगटातल्या मुला-मुलींच्या या स्पर्धा रविवारी ही सुरू राहणार असून रविवारी या स्पर्धांची सांगता होणार आहे.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे, पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळाचे सचिव रवींद्र चाफेकर, स्पर्धेचे टेक्निकल डायरेक्टर कोहली आदींच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संचालनालयाच्या ध्वजाचे आरोहण करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.