पालघर : भारतीय चलणाच्या एकोणीस लाख किंमतीच्या बनावट नोटा छापुन त्या बाजारात वितरित करणा-या पालघरच्या मेहबूब शेख आणि मालवणीच्या फहील शेख़ या दोन आरोपींना मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.
मालवणी पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, 21 वर्षीय फहील इरफान शेख़ हा आरोपी मालवणी परिसरात बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सपोनि शिवशंकर भोंसले आणि सपोनि निलेश साळुंके यांनी आपल्या पथकासह सापळा रचून मालाडच्या मालवणी भागात राहणा-या फहील शेख़ या आरोपीला 99,500 रुपये किंमतीच्या बनावटी नोटांसह अटक केली. आणि त्यांच्या विरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली असता या बनावट नोटा त्याने आपला 23 वर्षीय साथीदार मेहबूब नबीसाब शेख याच्याकडून आणल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे मालवणी पोलीसांनी पालघर मध्ये येवून आरोपी मेहबूब शेख याच्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरातून अठरा लाख रूपये किंमतीच्या 500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटा सापडून आल्या.
मालवणी पोलिसांनी पालघर मधून 2000 रुपयांच्या 500, 500 रुपयांच्या 1796, 200 रुपयांच्या 5, आणि 100 रुपयांच्या 5 बनावट नोटा अशा अठरा लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या दोन्ही आरोपींविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात कलम 489 (अ) 489 (ब), 489 (क), 489 (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.