पालघर : बदल हा सृष्टीचा नियम आहे.ही पंक्ती आजपर्यंत फक्त आपण ऐकत आलो होतो. कोरोनाच्या काळात त्याची प्रचिती आपणास वेळोवेळी आली आहे. शिक्षण क्षेत्राचे कोरोना काळात सर्वाधिक नुकसान झालं आहे. महाविद्यालयाचा अविभाज्य भाग असलेल्या ग्रंथालयात वाचकांची इच्छा असुन ही आज वाचक ग्रंथालयापर्यंत पोहोचण्यास असमर्थ आहेत असं दिसून येतं . हेच ग्रंथालयाचं वाचकांशी म्हणजेच विद्यार्थ्यांशी असलेलं नातं अचूक ओळखून त्यात नाविन्यपूर्ण बदल करून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी. आणि रा.ही. सावे ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमानं “ग्रंथालय आपल्या दारी” हा एक नवीन आणि आगळावेगळा उपक्रम सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाकडून राबविण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातल्या ज्या गावांमध्ये वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांची संख्या जास्त आहे अशा केळवा-माहीम, शिरगाव-सातपाटी, मासवण, निहे, लोवरे, नागझरी, वांदविले, खरशेत, काटाळे या गावांमध्ये रा. हि सावे ग्रंथालयातर्फे विद्यापिठीय अभ्यासक्रम, स्पर्धापरीक्षा, सामान्यज्ञान, कथा-कादंबऱ्या, मासिके, नियतकालिके या प्रकारची पुस्तके ३० दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत फक्त विद्यार्थीच नाही तर गावातले ग्रामस्थ सुद्धा यात सहभागी होऊ शकतात.
ग्रंथालय आपल्यादारी उपक्रमामुळे विधार्थांच्या सर्वांगीण विकासासोबत त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यास मदत होईल. विद्यार्थांचं शैक्षणिक नुकसान न होता त्यांना क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत मिळतील. तसचं कोरोना काळात स्पर्धापरीक्षा आणि इतर करियर संदर्भातल्या उपक्रमांसाठी तयारी करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची ही सवय लागेल. सर्वोत्कृष्ट वाचन स्पर्धेच्या निमित्तानं वाचनाची आवड निर्माण होईल असं प्रतिपादन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केलं.
सध्या रा.हि. सावे ग्रथालयात १ लाख १० हजारांपेक्षा अधिक विविध विषयांवरील पुस्तकांचा संग्रह आहे. आणि दिवसागणिक दररोज त्यात नवीन पुस्तकांची भर पडत असते. या उपक्रमामुळे वाचकसंख्या वाढणार असून खऱ्या अर्थानं त्या पुस्तकांचा सदुपयोग होईल,असं सुसज्ज ग्रंथालय प्रत्येकाच्या घरात आल्यानंतर नक्कीच त्या विध्यार्थाच्या ज्ञानात भर पडेल आणि त्याचा फायदा त्याला पुढील भवितव्यासाठी नक्कीच होईल. आपण नेहमी म्हणत असतो “जावे पुस्तकांच्या गावा” ह्या उपक्रमामुळे साक्षात पुस्तकेच विध्यार्थांच्या गावी जाणार आहेत. त्याचा पुरेपूर फायदा हे विद्यार्थी घेतील.
कोरोनाच्या संक्रमणीय परिस्थितीत गावोगावी असलेलं आणि महाविद्यालयात येता येत नसल्यानं ग्रामीण विध्यार्थाना एक परिणामकारक ग्रंथालय सेवादेण्याची हि अभिनव कल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात येणार असून अनेक विध्यार्थाना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी यांनी केलं.