पालघर : पालघर जिल्ह्यात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकिय कार्यक्रम जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते कोळगांवच्या पोलीस परेड मैदानात पार पडला. यावेळी काही पोलीस कर्मच्या-यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आलं.
पालघर जिल्हा हा सागरी, नागरी आणि डोंगरी अशा भौगोलिक विविधतेने नटलेला जिल्हा असून त्याचबरोबर वाढते औद्योगिकरण, नागरीकरणामुळे पालघर जिल्हा मुंबईच्या बरोबरीने राज्याच्या विकासात योगदान देत आहे. पालघर जिल्ह्याची ओळख साहित्यीक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य संग्रामात अनमोल असे योगदान दिलेला जिल्हा म्हणून कायम राहिली आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख असलेली वारली चित्रकला ही जगभरात पोहोचवणारे पद्मश्री स्वर्गीय जिव्या सोम्या म्हसे यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनातील स्थित्यंतरे जगभरात पोहोचवून आदीवासी संस्कृतीचा सन्मानच केला असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितलं.