पालघर : ग्रामीण भागातल्या महिला सक्षम व्हाव्यात, त्यांनी आपला स्वत:चा काही व्यवसाय सुरु करून प्रगती करावी, शेतीविषयक आवश्यक ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं जेणेकरून त्या स्वबळावर आपला काही उद्योग सुरु करू शकतील हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रा (Mahabank Rural Self Employment Training Centre) मार्फ़त पालघर तालुक्या मधल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत विविध बचत गटांच्या महिला फलोत्पादन, शेडनेट, नर्सरी आणि भाजीपाला लागवड या विषयी दहा दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे.
पालघर मधल्या केळवे इथं हे दहा दिवसांचं मोफत प्रशिक्षण सुरु असून या प्रशिक्षणात पालघर तालुक्यातल्या जवळपास 70 बचत गटांच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात महिलांना व्यवसायिक शेती, बँकेचे ज्ञान, उद्योगाला लागणारे भांडवल बँकेकडून कसे मिळवायचे, त्याविषयी लावणारा प्रोजेक्ट रिपोर्ट, विविध शासकीय योजना, एका उद्योजकांच्या अंगी कोणते पैलू असले पाहिजेत, भाजीपाला लागवड कशी करावी, शेडनेट, नर्सरी, फलोत्पादन(Horticulture), हवामानाचा अंदाज कसा घ्यायचा, पाण्याचे व्यवस्थापन, बियाणे आणि खतं कसे वापरावेत अशा विविध विषयांसंबधित माहिती लेक्चर्सच्या आणि अधूनमधून खेळाच्या माध्यमातून देण्यात आली. तसचं शेडनेट आणि नर्सरी विषयी प्रशिक्षण देताना महिलांना प्रत्यक्ष नर्सरी मध्ये नेवून प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली.
18 ते 45 वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगार महिला आणि पुरुषांना प्रशिक्षण देवून त्यांना उद्योजक बनवणे, त्यांच्या हाताला, कौशल्यांना हातभार लावणे हा या प्रशिक्षणा मागचा मुख्य उद्देश असल्याची माहिती यावेळी महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्राच्या (Rseti) विषयतज्ञ अल्का देवरे यांनी दिली. आतापर्यंत या प्रशिक्षण केंद्रामार्फ़त जवळपास चार ते पाच हजार लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यापैकी 90 टक्के लोकांनी उद्योगात कौशल्य प्राप्त केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्रशिक्षणात आम्हाला आपण उद्योजक कसे बनू शकतो, त्यात आर्थिक समस्या काय असतात तसचं उद्योग व्यवसायांचे विविध पैलू अगदी सोप्या भाषेत समजावण्यात येत असल्याचं यावेळी प्रशिक्षणात सहभागी असलेल्या महिलांनी सांगितलं. आणि पुढील काळात आम्ही एक चांगल्या महिला उद्योजक होवून दाखवू असा ठाम विश्वास यावेळी महिलांनी बोलताना व्यक्त केला.