पालघर : पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून इथं बाल विवाहांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अशा बालविवाहांना रोखण्यासाठी, त्यांना आळा घालण्यासाठी लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यातल्या जव्हार पोलीस ठाण्यात बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाह केल्यामुळे महिलांवर होणारे परिणाम याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
बालविवाह रोखण्यात पालघर पोलिसांना यश…………..
जिल्ह्यात पूर्वापर चालत आलेल्या स्थानिक रुढी, परंपरा तसचं शिक्षणाचा अभाव यामधून बाल विवाहाला प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रित्या पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येते. अशा बालविवाहाला कारणीभूत असलेल्या अनिष्ट रुढी, परंपरा मोडून काढण्यासाठी या जनजागृतीपर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बालविवाहामुळे निर्माण होणा-या घरघुती हिंसा , दुर्व्यवहार, बालवयात गर्भावस्था, माता मृत्युच्या प्रमाणात वाढ तसचं आरोग्याच्या समस्या आदी होणा-या दुष्परिणामां बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटिल यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी बालविवाह रोखण्याबाबत प्रतिज्ञा घेतली.
या जनजागृतीपर आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जव्हारच्या पतंग शहा कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मराड, महिला स्त्रीरोग तज्ञ अनिता पाटिल, पोलिस पाटिल, सरपंच, महिला, जेष्ठ नागरिक, महिला बचत गट तसचं महिला दक्षता सदस्य आदी उपस्थित होते.