पालघर : पालघर जिल्हा पोलिसांना चाइल्ड हेल्पलाइन या संस्थेच्या माध्यमातून एक बाल विवाह रोखण्यात यश आलं आहे. पालघर शहरातल्या न्यायालयाजवळ असलेल्या शांतीनगर परिसरात बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी पालघर पोलीस ठाण्यातल्या दोन अंमलदारांना साध्या वेशात घटनास्थळी खात्री करण्यासाठी पाठवले. त्यावेळी पोलिसांना आढळून की, विवाह होत असलेल्या मुलाचे वय हे १९ वर्षे आणि मुलीचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी होते.
पालघर पोलीस आणि पालघर चाइल्ड हेल्पलाईन या संस्थेनं हा बालविवाह होण्यापासून रोखला. यावेळी नातेवाईकांनी कारवाईस विरोध दर्शविला. पण पोलिसांनी त्यांचा विरोध मोडत बालविवाह थांबविला. दरम्यान महिला बालकल्याण समितीच्या आदेशानंतर या अल्पवयीन मुलीला विरार मधल्या गुड शेफर्ड संस्थेत पाठविण्यात आलं आहे. या प्रकरणात महिला बालकल्याण समितीच्या आदेशनुसार पालघर पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
बालविवाहांच्या दुष्परिणामां बाबत पोलिसांकडून जनजागृती………
पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटिल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मुलाचे वय २१ वर्ष आणि मुलेचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करू नये. अशा प्रकारचे बाल विवाह कुठे होत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षात संपर्क करावा.