पालघर : महाविद्यालयाच्या एकंदरीतच विकासाच्या प्रमाणकांमध्ये महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना दिलेल्या शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विविध जीवन कौशल्यांचे विद्यार्थ्यांना धडे देणे, धडे देण्याबरोबरच आपल्या आजुबाजूच्या परिसरातल्या सामान्य माणसांचं जीवन सुकूर करण्यासाठी अथवा तंत्रज्ञान, रोग उपचार आणि तत्सम क्षेत्रातल्या संशोधनाला चालना देणे हे महत्वाचे प्रमाणक मानण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये संशोधनवृत्ती विकसीत करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासन त्याचबरोबर व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची ठरते.
मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्यातल्या सामंजस्य करारानुसार मुंबई विद्यापीठाशी संलग्नित पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी यांच्यातील शिक्षकांना नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी जवळपास ४३,००,००० रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. राजीव गांधी विकास व तंत्रज्ञान आयोगाच्या या प्रकल्पा अंतर्गत पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या पदार्थ विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सपना जाधव यांना ‘‘Development of eco-friendly and nano porous phosphorus doped carbon nitride aerogel electrocatalyst for hydrogen production (Fuel) through water splitting’’ या प्रकल्पासाठी आणि याच महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिलीप यादव यांना ‘‘Sustainable and Scalable protocol for isolation of Camptothecin, an anti-cancer agent using local flora of Palghar District’’ या प्रकल्पासाठी प्रत्येकी ५,००,००० रुपयाचं अर्थसहाय्य मिळालं आहे.
९ वर्षाच्या चिमुकली स्वरानं केलं“सारपास”गिर्यारोहण यशस्वी……..
जवळपास १९० महाविद्यालयातून आलेल्या प्रकल्पामधून पालघर जिल्हयातून आलेल्या १०५ संशोधन प्रकल्पामध्ये जिल्हयातून ८ महाविद्यालयाच्या प्रस्तावांना राजीव गांधी आयोगातर्फे अर्थसहाय्य करण्यात आलं आहे. तिनही जिल्हयातून देण्यात आलेल्या १० प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प हे एकट्या पालघर जिल्हयातले आहेत.आणि त्यातले दोन महत्वाचे प्रकल्प सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना मिळाले आहेत. गेल्या १० वर्षापासून महाविद्यालयातल्या प्रशासन आणि व्यवस्थापन यांच्या पुढाकारानं, प्रोत्साहनानं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या संशोधन प्रवृत्तीला चालना देण्यासाठी महाविद्यालयातर्फे आर्थिक सहाय्य देण्यात येतं. त्याचा परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षापासून जिल्हास्तरीय आणि विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. सपना जाधव यांनी अविष्कार स्पर्धेत विद्यापीठ आणि राज्यस्तरावर संशोधक म्हणून सुवर्ण पदक मिळवत महाविद्यालयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यावर्षी यज्ञेश हरड या विद्यार्थ्यानं राज्यस्तरावर संशोधन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलं. डॉ. सपना जाधव यांच्या नावावर ३ पेटंट तर डॉ. दिलीप यादव यांच्या नावावर १ पेटंट मिळालं आहे. तसचं गेल्या पाच वर्षात महाविद्यालयातल्या विविध विभागातल्या शिक्षकांना ५० पेक्षा जास्त लघु शोधप्रकल्प विद्यापीठातर्फे प्राप्त झाले आहेत.
याबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे दोनही प्राध्यापकांचे अभिनंदन करत म्हणाले की, गेल्या १० वर्षात प्रयत्नपूर्वक विद्यार्थी शिक्षकांमध्ये संशोधन प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं फलीत म्हणून आज महाविद्यालयाच्या दोन संशोधन प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळालं. पुढे ते म्हणाले की, मुलभूत संशोधनासाठी गेल्या दहा वर्षापासून संस्थेचे अध्यक्ष अॅड्. जी.डी. तिवारी आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, असे मला नमूद करावसं वाटतं. अशा समाजाभिमुख प्रकल्पातूनच महाविद्यालय समाज उत्तरदायित्व निभावेल याची मला खात्री आहे असं ही ते म्हणाले. या प्रकल्पासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील आणि अविष्कार संशोधन समिती मुंबई विद्यापीठाच्या डॉ. मिनाक्षी गुरव यांचं मार्गदर्शन लाभलं .