पालघर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, वाडा, पालघर आणि वसई या चार तालुक्या मधल्या ४२ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातल्या महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४२ कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पुरस्कार सोहळयात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात आलं.
डहाणू आणि वाडा तालुक्यातल्या १० ग्रामपंचायती, पालघर तालुक्यातल्या १४ आणि वसई तालुक्यातल्या ८ ग्रामपंचायती अशा ४२ ग्रामपंचायती मधल्या ४२ महिलांचा गौरव यावेळी करण्यात आला.या सोहळयाला संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक देखील या उपस्थित होते.
पुरस्कारासाठीचे पात्रता निकष :
महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महिला या त्याच ग्रामपंचायतीतील गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असाव्या, त्याचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती गट ग्रामपंचायतीमध्ये केलेलं असावं, महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 3 वर्ष कार्य केलेले असावे, पुरस्कार प्राप्त महिला या सात वर्षानंतर या पुरस्कारासाठी पुन्हा पात्र ठरतील, महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव अणि संवेदनशीलता असावी, सामाजिक क्षेत्रात सक्रीय सहभाग असावा, महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी, बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निमुर्लन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा यासारख्या पात्रतेच्या निकषांवर हा पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली.