पालघर : मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातल्या चारोटी टोल नाक्याजवळील तवा इथं धाग्यानं भरलेला एक टेम्पो घोळ नदीत कोसळल्याची घटना आज सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत टेम्पो चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की, धाग्यानं भरलेला हा टेम्पो गुजरातहुन मुंबईच्या दिशेनं जात होता. दरम्यान चारोटी टोल नाक्यापासून काही अंतरावर जात असताना या टेम्पो चालकाचं टेम्पोवरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो नदीवर असलेल्या डिवायडरला धडकून खाली नदीत कोसळला. घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी आणि हायवे पेट्रोलिंग टीमनं घटनास्थळी पोहचून क्रेनच्या मदतीनं या टेम्पोला आणि चालकाला बाहेर काढलं. आणि जखमी झालेल्या चालकाला उपचाराठी रुग्णालयात दाखल केलं. जिथं त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.