पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांअतर्गत असलेल्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते टॅब, सायकल आणि आवश्यक शैक्षणिक वस्तुंचं वाटप करण्यात. पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षण मिळावं यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा शासन देणार असल्याचं यावेळी सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितलं. विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहेत. त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन उत्तम नागरीक घडविणं हे शिक्षकांच्या हाती असल्यानं शिक्षकांनी तळमळीनं दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विविध विषय शिकवण्याचं कौशल्य असलेल्या शिक्षकांनी ऑनलाईन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य केलं पाहिजे असं मत ही यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव प्रदिपकुमार व्यास, जव्हारच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेतले विद्यार्थी आदी उपस्थित होते.