पालघर : आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात जंगलात आणि द-याखो या मध्ये राहत असल्यानं त्यांना शिक्षणाच्या सोई उपलब्ध होत नाहीत, म्हणून अतिदुर्गम भागात राहणा-या आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या निवासाची सोय व्हावी या दृष्टिकोनातुन आम्ही मोठ्या प्रमाणात आश्रमशाळा आणि वसतीगृह उभारत आहोत असं मत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलं. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यात मधल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाचा तसचं शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीचा भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.
आपण जर आदिवासी विद्यार्थ्याना शिक्षणाच्या सर्व सुविधा या भागात उपलब्ध करून दिल्या तर विद्यार्थ्याना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाची ओढ़ लागेल आणि ते आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतील हा या आश्रमशाळेंच्या आणि वसतीगृहांच्या सुसज्य इमारती बांधण्या मागचा उद्देश होता असं त्यावेळी सांगितलं. अशा प्रकारचे वसतीगृह आणि आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला असून यावर्षी आम्ही ४० आश्रमशाळा बांधण्यासाठी मान्यता दिली आहे, आजचं भूमीपूजन त्याचाच एक भाग असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून शिक्षणाचे सेंटर्स चांगले व्हावेत या दृष्टीकोनातून या आश्रमशाळा आणि वसतीगृह आम्ही उभी करत आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याना टॅब, सायकल आणि शैक्षिणक वस्तुंचं वाटप ..
यावेळी आदिवासी विकास मंत्री यांनी डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातल्या तवा इथं शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाच्या इमारतीचं उद्घाटन करून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सायवन आणि मेढवण इथं शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीचं उद्घाटन केलं. आणि या नव्या इमारतींची पाहणी केली. त्याचबरोबर त्यानी पालघर जिल्ह्यातल्या मनोर इथं उभारण्यात येत असलेल्या सुसज्य अशा वारली हार्ट ला भेट देवून सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.
हे नव्यानं बांधण्यात आलेलं मुलांचं वस्तीगृह तीन मजली असून इथं 142 मुलं राहण्याची व्यवस्था आहे. या आश्रमशाळेत डहाणू तालुक्यातले मुलं मोठ्याप्रमाणत शिक्षण घेण्यासाठी येतात. त्याचबरोबर पालघर आणि तलासरी तालुक्यातले विद्यार्थी काही प्रमाणात इथं शिकण्यासाठी येत असतात.