पालघर : पालघर जिल्ह्यात इन्कोव्हॅक ही लस उपलब्ध झाली असून जिल्ह्यातल्या बोईसर, पालघर तसचं वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात ६० वर्षावरील नागरिकांना त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणीद्वारे इन्कोव्हॅक लसीचं लसीकरण करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या बोईसरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, पालघरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसचं वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातल्या बोळींज, वसई, चंदनसार, वालीव, आंबेडकर नगर, आचोळे, जुचंद्र, पाटणकर पार्क, धानीव, नवघर पूर्व, दिवाणमान आणि निदान अशा जवळपास १२ प्राथमिक आरोग्य केंद्रात इन्कोव्हॅक ही लस देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोव्हीशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन चा दुसरा डोस घेऊन ६ महिने पूर्ण झालेल्या व्यक्तींना इन्कोव्हॅक (INCOVACC) ही लस प्रिकॉशन डोस म्हणून देण्यात येत आहे. इन्कोव्हॅक लसीचा डोस नाकावाटे देण्यात येत असून एका व्यक्तीला ०.५ml चे ८ थेंब (४ थेंब प्रत्येक नाकात) नाकावाटे देण्यात येत आहेत.
जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सागर पाटिल याबाबत माहिती देताना सांगितलं की, जिल्ह्यात इन्कोव्हॅक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यात लसीची मागणी असलेल्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे ही लस घेण्यासाठी नागरिकांकडून मागणी करण्यात येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही ही लस उपलब्ध करून देणार आहोत. सध्या प्रिकॉशन डोस असलेली ही लस घेण्याकडे लोकांचा फारसा कल दिसून येत नाहीये त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करणे देखील आवश्यक असल्याचं मत यावेळी डॉ. पाटिल यांनी व्यक्त केलं.