पालघर : आपल्या केवळ सुगंधान सर्वांची मनं मोहून टाकणारं फुल म्हटलं तर ते म्हणजे मोगरा. ज्याचा गजरा महाराष्ट्रा मधल्या ९९ टक्के महिला आपल्या केसात मोठ्या आनंदानं माळतात. खासकरून सणासुदीच्या दिवसांना. आणि याच सुगंधीत आणि मनमोहक अशा मोग-याची लागवड आपल्या शेतीत केलीय पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्या मधल्या हिरवी गावात राहणारे शेतकरी भागीरथ भुसारा यांनी. आणि या फुल शेतीतुन ते वर्षाला लाखों रूपयांचं उत्पन्न मिळवत आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या अतिदुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मोखाडा तालुक्या मधल्या हिरवी गावात राहणारे शेतकरी भागीरथ भुसारा. यांनी आपल्या शेतात सुगंधित अशा मोग-याची लागवड केली आहे. बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेल्या भागीरथ यांनी आपल्या वडीलोपार्जित शेतीसोबतचं तीन वर्षांपूर्वी आपल्या शेतातल्या एक एकर क्षेत्रात अडीच हजार रोपांची लागवड करत फुल शेतीला देखील सुरुवात केली.आणि 6 महिन्यांमध्ये त्यांना या शेतीतुन उत्पन्न मिळणं सुरु झालं. आपल्या पत्नी, मुलं,आणि आई-वडिल यांच्या सहाय्यानं ते ही संपूर्ण शेती करतात. भागीरथ मोग-याच्या शेतीबरोबरच आपल्या शेतात काजू, केसर, आंबा, भुईमूग, हरभरा, स्टोबेरी, कलिंगड, वाटाणा, मसूर या सारखी पिकं देखील घेतात.
भागीरथ यांनी आपल्या शेतात बंगलोरी जातीच्या अडीच हजार रोपांची लागवड केली आहे. मोग-याला पाणी देण्यासाठी ते ड्रीप इरिगेशन पद्धतीचा वापर करतात. या शेतीतुन दररोज जवळपास १० किलो मोगरा निघत असतो. दररोज एवढा मोगरा तोडण्यासाठी त्यांना जवळपास पाच मजूर लागतात. मजूरांसोबत त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील फुलांच्या तोडणीसाठी त्यांना मदत करतात. त्यामुळे अतिरिक्त मजुरीचा खर्च देखील वाचतो. जवळचं नाशिक बाजारपेठ उपलब्ध होत असल्यानं तिथं त्यांचा माल मोठ्याप्रमाणात विकला जातो. या मोग-याच्या फुल शेतीतून त्यांना महिन्याला सर्व खर्च वगळता दीड लाख रूपयां पर्यंतचं उत्पन्न मिळतं. तर वर्षाकाठी सर्व खर्च वगळता ६ लाखांपर्यंतचं उत्पन्न त्यांना या शेतीतुन मिळत असल्याचं ते सांगतात.
पूजा, मंगलकार्यात आणि सणासुदीला या मोग-याच्या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे मे आणि जून महिन्यात तर त्यांना या फुल शेतीतुन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही फुलशेती असल्यानं एकदा लागवड केल्यानंतर १२ ते १३ वर्ष या मोग-याच्या शेतीतुन उत्पन्न घेता येतं. त्यामुळे यासाठी सुरुवातीला एकदाचं जास्त मेहनत घ्यावी लागते. या फुल शेतीतुन लाखोंचं उत्पन्न मिळवत भागीरथ आपल्या गावातल्या मजूरांना देखील या शेतीतुन रोजगार मिळवून देत आहेत. त्यामुळे इतर शेतक-यांनी देखील त्यांच्याकडून प्रेरणा घेवुन आपल्या शेतात देखील असे वेगवेगळ्या शेतीचे प्रयोग नक्कीच करून पाहिले पाहिजेत.