पालघर : पालघर जिल्ह्यातल्या सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयात व्यावसायिक विभाग-उद्यान विद्याशास्त्र या विभागामार्फत घेण्यात आलेल्या फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताचं पार पडला. या सोहळा दीपक बोरसे, प्राचार्य डॉ. किरण सावे आणि उपप्राचार्य प्रा. गोपीनाथ नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रशिक्षण हे २०१८-२०१९ पासून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात सुरु करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत जवळपास ६ वेळा पालघर, ठाणे आणि मुंबई मधल्या विविध स्तरातील २१ ते ८० वर्ष वयोगटातल्या विद्यार्थी, गृहिणी, नागरिक, जेष्ठ नागरिक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.
भविष्यातील विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी लक्षात घेता नोकरदार होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा आणि त्या दृष्टीनं स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करा असा मौलिक सल्ला यावेळी प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी यांना दिला. समस्येपेक्षा आपण मोठे झालो तर समस्या आपोआपच छोटी होते आणि त्यावर उपाय शोधायला सोपे होते असं ही ते म्हणाले. यावेळी उपप्राचार्य प्रा. गोपीनाथ नागरगोजे यांनी विपणनाबद्दल मार्गदर्शन करताना बचत गटांचे उदाहरण देऊन आपला माल परदेशात निर्यात करण्यासाठी व्यावहारिक उपाय सुचविले.
मुबलक प्रमाणात फळे, भाज्या, फुले, मासे अशा सर्व घटकांची एकाचवेळी उपलब्धता असणारा पालघर हा एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींनी पुढे येऊन जिल्ह्यातल्या संधीचा फायदा घेऊन लघु उद्योजक बनावं असं आवाहन या कार्यक्रमात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, पालघर चे प्रभारी अधिकारी डॉ. दीपक बोरसे यांनी केलं.
पालघर जिल्ह्यात मुबलक प्रमाणात फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते. त्या अनुषंगाने या नाशिवंत फळांचा नाश न होता त्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने व उद्योजकतेला चालना मिळण्यासाठी या प्रशिक्षणाची सुरुवात कनिष्ठ महाविद्यालयातल्या प्रा. प्रविणा कोचरेकर आणि प्रा. आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
आंबा, पेरू, चिकू, फणस, जांभूळ, आवळा, पपई, केळी, अननस, लिंबू, सफरचंद यासारखी विविध फळे आणि पालक, मेथी, मिरची, कांदा, टोमॅटो आदी फळे आणि भाज्यांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध सरबत, जॅम, जेली, कँडी, लोणचे यांसारखे पदार्थ व्यापारी तत्वावर तयार करणे, त्यांचे पॅकिंग, सिलिंग प्रक्रिया विषयक यंत्र सामग्री, उत्पादन खर्च आणि उत्पादन शुल्क ठरवणे यासंदर्भातील प्रात्यक्षिके या प्रशिक्षणात देण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीमधून काहींनी आपले घरघुती उद्योग तसेच व्यापारी तत्वावर सुरु केले आहेत. त्यापैकी अमिता अनिल पाटील यांनी वाणगाव येथे फळे व भाज्या निर्जलीकरण व्यवसाय यशस्वीरीत्या सुरु केला आहे. तसचं इतरही अनेक प्रशिक्षणार्थीनी स्वतंत्रपणे किंवा बचत गटाच्या माध्यमातून आपले व्यवसाय सुरु केले आहेत. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. किरण थोरात तर आभारप्रदर्शन प्रा. अनिता लोहार यांनी केले.