पालघर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर होणा-या हल्ल्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. हे लक्षात घेता या भटक्या कुत्र्यांचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ नये म्हणून पालघर जिल्हा परिषदेनं पाऊल उचलत जिल्ह्यात पहिल्यांदाचं भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी मोहिम राबवणारी पालघर जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद असणार आहे.
जिल्हयातल्या श्वानदंशच्या वाढत्या घटना, जीवघेणे हल्ले आणि भटक्या कुत्र्यांच्या दहशतीनं जिल्ह्यातल्या बऱ्याच ग्रामपंचायती त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांचं नियंत्रण आणि बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्या अनुषंगानं पशुसंवर्धन सभापती संदिप पावडे यांनी विशेष प्रयत्न करून जिल्हा परिषदेच्या सेस निधीतुन २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातल्या सर्वात जास्त श्वानदंशाच्या घटना असणाऱ्या 3 तीन ग्रामपंचायतीची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. त्यात वसई तालुक्यातल्या अर्नाळा, डहाणु तालुक्यातल्या चिंचणी आणि पालघर तालुक्यातल्या दांडी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
ही मोहीम प्रभावीपणे आणि सुलभतेनं राबविण्यासाठी ती बाह्यस्त्रोताद्वारे प्राणी कल्याणचं काम करणाऱ्या संस्थांच्या मार्फत करण्याचं ठरवण्यात आलं आहे. बाबतचं जाहीर निवेदन देऊन इच्छुक संस्थांना आव्हान देखील करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन व कृषी समिती सभापती संदीप पावडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच समाज कल्याण समिती सभापती मनीषा निमकर, जि. प. सदस्य वैदेही वाढाण, आशा चव्हाण, महेंद्र भोणे, करिष्मा उमतोल यांच्या प्रमुख उपस्थितीत भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.