पालघर : सध्या राज्यातल्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडी पाहता जनसामान्यांमध्ये या राजकीय परिस्थिती विषयी तीव्र नाराजी दिसून येत आहे. जनसामान्यांमध्ये असलेली नाराजी बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संपूर्ण महाराष्ट्रात या राजकीय परिस्थिती विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी एक सही संतापाची हे आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्यात देखील शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक सही संतापाची हे आंदोलन करण्यात आलं.
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या ओस्तवाल एम्पायर आणि पालघर रेल्वे स्थानकावर मनसेचे पालघर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक सही संतापाची हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी समीर मोरे आणि मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर नागरिकांनी एका फलकावर सह्या करून सध्याच्या राजकीय परिस्थिती विषयी आपला संताप व्यक्त केला.
मोगरा फुल शेतीतून मिळवतोय ६ लाखांपेक्षा जास्तचं उत्पन्न ….
यावेळी मनसेचे पालघर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समीर मोरे म्हणाले कि, महाराष्ट्रामध्ये पक्षांतराचं , फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरु आहे. असं करून मतदारांच्या भावनांशी खेळलं जात आहे. या अशा राजकारणा विषयीच्या आपल्या भावना काही लोकं व्हाट्सअप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. मात्र काही असे ही लोकं आहेत की त्यांना या गलिच्छ राजकारणा विषयी आपल्या भावना, आपला संताप व्यक्त करता येत नाहीये. तर अशा जन सामान्य नागरिकांसाठी आम्ही एक सही संतापाची हे आंदोलन छेडलं आहे. जेणेकरून या माध्यमातून फलकावर सह्या करून जनतेला आपल्या भावना व्यक्त करता येतील.
सध्या अगदी गलिच्छ राजकारण सुरु आहे. कोणी ही कोणाशी एकनिष्ठ राहिलेलं नाही. त्यामुळे अशा या सर्व प्रकाराला महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे. त्यामुळे अशा गद्दार लोकांना निवडून देवू नये. यापुढे महाराष्ट्रातल्या जनतेनं अशा लोकांना निवडून न देता राज ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी असं ही समीर मोरे यावेळी म्हणाले.