पालघर : पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा असून इथं पावसाळयात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. आज देखील जिल्ह्यातल्या अनेक भागांत पारंपारिक पद्धतीने भात शेती केली जाते. असं असताना कृषि विभागाकडून आता जिल्ह्यातल्या शेतक-यांना भात लागवडीच्या विविध आधुनिक पद्धतींची महिती प्रत्यक्ष प्रात्यक्षिका द्वारे देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता या आधुनिक भात लागवडीच्या पद्धतींचा अवलंब करू लागले आहेत. आणि अधिक उत्पन्न घेऊ लागले आहेत. अशाच काहीश्या आधुनिक भात लागवडीच्या पद्धतीचा वापर करून एका ७५ वर्षीय शेतक-यांनं एक हेक्टर क्षेत्रात ६० क्विंटल पेक्षा जास्त तांदूळाचं उत्पन्न घेवुन दाखवलं आहे.
नाबार्डच्या मदतीनं पालघर जिल्ह्यातल्या अनेक आदिवासी कुटुंबांना मिळतोय रोजगार……
हे आहेत पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या आसनगावात राहणारे शेतकरी विद्याधर गोविंद कोरे. 75 वर्षांचे विद्याधर कोरे हे या वयात देखील शेती करत आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून ते पारंपारिक पद्धतीनचं भात शेती करत होते. मात्र गेल्या वर्षी त्यांना कृषि सहाय्यक थोरात यांच्याकडून SRT म्हणजेच सगुणा राईस टेक्नीक या आधुनिक भात लागवडीच्या पद्धतीची माहिती मिळाली. आणि त्यांनी कृषी विभागाकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे या सगुणा राईस टेक्नीकची माहिती जाणुन घेतली. आणि मग त्यानंतर त्यांनी आपल्या एक हेक्टर क्षेत्रात सगुणा राईस टेक्नीक पद्धतीच्या माध्यमातून भात लागवड केली. या पद्धतीचा वापर केल्यामुळे त्यांना शेतीसाठी लागणारा खर्च देखील कमी आला तसचं मजूरी देखील कमी लागली. त्यांनी ६० क्विंटल पेक्षा जास्त भाताचं उत्पादन हे या सगुणा राईस टेक्नीकचा वापर करून घेवुन दाखवलं आहे. इतके उच्चांकी उत्पादन घेतल्यानं ते डहाणू तालुक्यातले दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. कोरे यांनी डहाणू तालुक्यात पहिल्यांदाचं SRT म्हणजेच सगुणा राईस टेक्नीक पद्धतीचा वापर केला. आणि त्याद्वारे हेक्टरी 60 क्विंटल 57 किलो भाताचं उत्पादन घेत त्यांनी कृषि विभागाच्या खरीप हंगाम 2021-22 तालुकास्तरीय पीक स्पर्धेत सर्वसाधारण गटातुन हा सन्मान मिळवला.
पारंपरिक शेतीत नांगरणी करणं, लावणी करणं, पेरणी करणं, उखळणी करणं यासारख्या सर्व पद्धतींमध्ये खुप वेळ लागतो. मात्र एसआरटी लागवडीच्या पद्धती मध्ये कॉमन बेड वरती म्हणजेच उंचवटे तयार करून त्याच्यावरती टोकन्नी पद्धतीने भात शेती करता येते. या पद्धतीमध्ये २५-२५ सेंटीमीटर वर टोकन्नी केली जाते. त्यामुळे पिकात अंतर समांतर राहते. २५-२५ सेंटीमीटर अंतर राहत असल्यानं भाताची मुळात मजबूती चांगली राहते. आणि हवा खेळती राहते. त्यामुळे त्याला खत चांगल्या प्रकारे लागते. लागवडी नंतरच्या काळात पाऊस जरी जास्त झाला तरी उंचवटे केलेले असल्यानं आणि बेड उंच असल्यानं पाण्याच्या निचरा होवून जातो. त्यामुळे जास्त पावसात देखील सगुणा पद्धतीने लावलेला भात पडत नाही. परिणामी भात पिकाचं नुकसान होतं नाही. आणि उत्पन्न चांगलं होतं. लागवडीसाठी आणि मजूरीसाठी लागणारा खर्च कमी होतो. त्याचबरोबर एकच वेळ नांगरणी करून पुढील तीन वर्ष त्यावर भातशेती करता येते.