पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार , मोखाडा, विक्रमगड या अतिदुर्गम भागातल्या ग्रामीण गावपाड्यांना जोडणारे रस्ते आणि पूल नसल्यानं नागरिकांना वाहत्या नद्यांमधल्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं वारंवार उघड होत आहे. मोखाडा तालुक्यातल्या कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतल्या जवळपास चार ते पाच पाड्यांना जोडणाऱ्या पिंजाळ नदीवर पूल नसल्यानं इथल्या नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे.
कुर्लोद ग्रामपंचायत हद्दीतल्या शेंड्याचा पाडा, आंबे पाडा , रायपाडा आणि जांभूळपाडा या पाड्यां मधल्या नागरिकांना पावसाळ्यात नदीच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या पाड्यांची लोकसंख्या 500 पेक्षा ही अधिक आहे. मात्र गावाबाहेर पडण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना पिंजाळ नदी पार करावी लागत असून या नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात चारही महिने पिंजाळ नदी दुधडी भरून वाहत असते. या काळात गावात शिक्षक ही पोहोचू शकत नसल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी देखील खेळ सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला गावात कोणी ही व्यक्ती आजारी पडल्यास लाकूड आणि चादरीच्या साह्यानं डोली करून इथल्या रुग्णांना लाकडी फळीच्या आधारावर नदी पार करावी लागते .
एसआरटी पद्धतीचा वापर करून घेतलं ६० क्विंटल पेक्षा जास्त भाताचं उत्पादन
मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी पिंजाळ नदीवर पूलाची मागणी होत असून याकडे प्रशासन आणि सरकार मात्र डोळेझाक करत असल्याच चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजाळ नदीवर पूल उभारून शेंड्याचा पाडा, आंबेपाडा , रायपाडा आणि जांभूळपाडा या गावातल्या नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी दिलासा द्यावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे .
पालघर जिल्ह्यात आजही शेकडो गावपाड्यांवर जाण्यासाठी मुख्य रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिकांना गावाबाहेर ये जा करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकावा लागतोय. मुंबई, ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघर जिल्ह्यात हे भीषण वास्तव दिवसेंदिवस उघडत होत असून सरकार याची दखल कधी घेणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.