पालघर : पालघर जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस होत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज ही जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरुचं आहे. जिल्ह्यात होत असलेल्या पावसाची स्थिती पाहता आज जिल्ह्यातल्या सर्वशाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिका-यांनी सुट्टी जाहिर केली आहे. या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांत पाणी साचलं असून रस्त्याना नद्यांचं स्वरूप आलं आहे. जिल्ह्यातला पालघर – मनोर हा रस्ता पाण्याखाली गेला असल्यानं या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर विक्रमगड-मनोर रस्त्यावरील पाचमाड इथला रस्ता पाण्याखाली गेल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वसई, विरार, नालासोपारा भागांत देखील ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या सूर्या प्रकल्पाची धामणी आणि कवडास ही दोन्ही धरणं भरली गेली आहेत. सर्वात मोठी पाणी क्षमता असलेल्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे २०० सेंटीमीटरने उघण्यात आले असून धामणी धरणातून ७२३ क्युमेक आणि कवडास धरणातून १ हजार ९४० क्यूमेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून सूर्यानदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसचं कोणीही या नदी किनारी जाऊ नये, पुलावर पाणी असल्यास पूल ओलांडू नये, मासेमारी साठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. जिल्ह्यात आज 185.1 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.