पालघर : जेएसडब्ल्यू औद्योगिक समूहाचा उडान शिष्यवृत्ती प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताचं सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संपन्न झाला. सामाजिक उत्तरदायित्व निधी म्हणजे सीएसआर फंडातून जेएसडब्ल्यू कंपनी व्यावसायिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या गुणी आणि गरजू विद्यार्थ्यांना उडान ही शिष्यवृत्ती देते. या माध्यमातून पालघर परिसरातल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, सेंट जॉन महाविद्यालय, थीम महाविद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था पालघर या शिक्षण संस्थातील जवळपास चारशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आल्या आहेत. दांडेकर महाविद्यालयातले एकशे शहाऐंशी विद्यार्थी हे या शिष्यवृत्तीचे लाभार्थी ठरले. यावेळी विविध महाविद्यालयातल्या निवडक लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद ….
जेएसडब्ल्यू या कंपनीने दिलेला आर्थिक मदतीचा हात ही संधी असून त्याचं विद्यार्थ्यांना सोनं करावं अशी अपेक्षा यावेळी प्लांट हेड अजय खंडेलवाल यांनी व्यक्त केली. योग्य दिशेने केलेली सातत्यपूर्ण मेहनत हे यशाचे गमक आहे असे प्रतिपादन यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना हर्षवर्धन नवाथे यांनी केलं. यशस्वी होण्याचे मूलमंत्र सांगत त्यांनी केलेला शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. उडान सारख्या शिष्यवृत्ती घेऊन आपण आपले ध्येय साध्य केले पाहिजे, असे आवाहन यावेळी अमोल सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना केलं. तर सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी आपल्या मनोगतातून जेएसडब्ल्यू यांच्या या औदार्यशील शिष्यवृत्ती उपक्रमाचं कौतुक करत आभार मानले.
यावेळी दिपाली जाधव, अनिषा भोईर, श्रेयस शेट्टी, आरती महातो, मयूर धांगडा, मानसी अग्रवाल या लाभार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञभाव व्यक्त केला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख, डॉ. तानाजी पोळ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कुडू यांनी केलं. पालघर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे काम पाहणारे संतोष गायकवाड यांचे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.