पालघर : दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट ला साजरा होणा-या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला यंदा मच्छीमार समाजाचे एक प्रतिनिधी म्हणुन पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी गावचे रहिवासी आणि सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन असलेले राजेंद्र शांताराम मेहेर आणि त्यांच्या पत्नी सुलभा राजेंद्र मेहेर यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. आपल्याला पहिल्यांदाचं हा स्वातंत्र्यदिनाचा मनमोहक सोहळा प्रत्यक्ष पाहण्यास मिळणार असल्यानं या कुटुंबात अत्यंत आनंदाचं वातावरण आहे.
पालघर जिल्ह्यातलं सातपाटी हे महाराष्ट्रातलं महत्वाचं मासेमारी बंदर आहे. इथल्या मासेमारी व्यवसायाची नोंद १८ व्या शतकातल्या मुंबई गॅझेट मध्ये आहे. मासेमारी सोबतचं स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण भूमिका निभावणारं गाव अशी या सातपाटी गावची ओळख आहे. स्वातंत्र्यच्या चळवळीत सातपाटी गावातले हुतात्मा काशिनाथ पागधरे आणि ४७ स्वातंत्र सैनिकांसह इतर अनेक अज्ञात कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.
जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या 991 जागांसाठी सरळसेवेनं भरती……
मच्छीमारांच्या कल्याणासाठी आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रात निळक्रांति घडवून आणण्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी ही एक विकास योजना आहे. पर्यंत मासेमारीच्या निर्यातीतून उत्पन्न वाढविणं, मासे उत्पादन आणि उत्पादकता विस्तार वाढवणं, टिकाऊ, जबाबदार, सर्वसमावेशक आणि न्याय्य पद्धतीनं मत्स्यपालनाची संभाव्यता वाढवणं, मत्स्यव्यवसाय क्षेत्रसंबंधित कामांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणं, देशातील मत्स्यपालनाचे क्षेत्र सुधारणे ही या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. याच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा सातपाटी गावातल्या मच्छीमारांना लाभ मिळत आहे.
या योजनेच्या लाभा विषयी चेअरमन राजेंद्र मेहेर यांनी माहिती देताना सांगितलं की, मत्स्य वाहतुक, शीतगृह आणि मत्स्य उत्पादन वाढवन्याच्या दृष्टीनं या योजनेच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ आम्हाला मिळाला आहे. प्रामुख्यानं महिलांसाठी वाहानाची सुविधा व्हावी या दृष्टीनं योजना आली आहे. त्यात महिलांना प्राधान्य देण्यात आलं असून वाहनासाठी त्यांना 60 टक्के अनुदान देण्यात येतं. त्याचबरोबर केंद्र सरकारनं यावर्षी सातपाटीला २८१ कोटींचं मत्स्य बंदर मंजूर केलं आहे. लवकरचं त्याचं काम सुरु होणार आहे. या योजनेअंतर्गत धोरणात्मक निर्णय घेतल्यानं मत्स्य व्यवसायाला चालना मिळू शकेल. जिल्ह्यात माश्यांची ने-आन करण्यासाठी आता या योजनेच्या माध्यमातून चार वैन येणार आहेत. आतापर्यंत गावात महिला उघड्यावर मच्छी विक्री करताना दिसून येत आहेत.मात्र आता लवकरचं महिलांच्या सुविधेच्या दृष्टीनं याचं मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत साटपाटी गावात एक अत्याधुनिक सुसज्ज असं मच्छी मार्केट तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून गिर्हाईकापर्यंत ताजे मासे पोहचू शकतील.
आमचं स्वातंत्र्य सैनिकांचं गावं असून दिल्लीला मच्छीमार समाजाचे प्रतिनिधि म्हणून आम्हाला या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळयासाठी आमंत्रित करण्यात आल्यानं अभिमान वाटत आहे. जो स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आम्ही टिव्ही वर पाहतो, तो आता प्रत्यक्ष पाहण्यास मिळणार असल्यानं अत्यंत आनंद होत असल्याच्या भावना यावेळी राजेंद्र यांच्या पत्नी सुलभा मेहेर यांनी व्यक्त केल्या.