पालघर : महाविद्यालय सुरु होताच तरुणांना वेध लागलेले असतात ते मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे. अर्थात युथ फेस्टीव्हलचे. मुंबई विद्यापीठाचा ५६ वा युवा महोत्सव नुकताचं पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संपन्न झाला. या महोत्सवाच्या विविध स्पर्धांमध्ये अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयानं २२ पारितोषिकं मिळवून आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयानं २० पारितोषिकं मिळवत आपले वर्चस्व कायम राखलं.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवात जवळपास ४० स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी परीक्षक म्हणून कलेच्या विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाचं उद्घाटन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्या हस्ते संपन्न झालं .
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातून अनेक दर्जेदार कलाकार घडत असतात. या महोत्सवात झोन क्र. ५ मधून जवळपास ३२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी संगीत,नृत्य,नाट्य अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या कलेचं सादरीकरण केलं. परफॉर्मिंग, लिटररी, फाईन आर्ट्स या तीन प्रकारातल्या स्पर्धांचा समावेश यात करण्यात आला होता.यावेळी दर्जेदार संहितांच्या जोरावर विद्यार्थ्यांनी परीक्षकांची मने जिंकली. अंगी कलागुण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवा महोत्सव म्हणजे एक हक्काचं व्यासपीठ असते.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचा त्यांच्या २५ वर्षाच्या सांस्कृतीक क्षेत्रातील योगदानासाठी महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य अमिता राऊत, आर.के.शेट्टी, दिनेश दुबे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.तानाजी पोळ, उपप्राचार्य प्रा.महेश देशमुख, डॉ.हर्षद वनमाली, डॉ.श्रेया मिश्रा आदी उपस्थित होते. युवा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.मकसूद मेमन, प्रा.तेजस चौधरी, प्रा.हर्षल चौधरी, प्रा.मोनिका सिंग, प्रा.हिमांशू पाटील, प्रकाश चाबके, मनीष पाटील, उमेश मोरे, संदेश मेरे, मनीष पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.