पालघर : पालघर जिल्हयातल्या अतिदुर्गम भागांमधल्या गाव पाड्यांवर दळण-वळणाच्या सुविधेच्या अभाव असल्यानं त्या ठिकाणी आरोग्य सुविधा पोहचू शकत नाहीत. त्या अनुषंगानं शासनाच्या प्रस्तावित बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेतुन ( Birsa Munda Joduraste scheme ) अशा गाव – पाद्यांना जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी ३५४७९.५० लक्ष रकमेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पालघर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत स्थळ पाहणी करुन न जोडलेली संपर्कहीन ९ गावांची आणि १५४ पद्यांची अशी जवळपास १६४ गाव आणि पाड्यांची सुनिश्चिती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनानं बिरसा मुंडा जोडरस्ते योजना लागू करून महाराष्ट्रातल्या आदिवासी वस्त्यांना जोडण्यासाठी ५००० कोटी रकमेची भरीव तरतूद केली आहे. शासनाच्या या प्रस्तावित बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेतून पालघर जिल्ह्यातल्या गाव-पाड्याना जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी ३५४७९.५० लक्ष रूपये रकमेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सन २०२३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १६३ वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडणे बाकी आहे. न जोडलेल्या १६३ वस्त्या मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी १४० रस्त्यांची आवश्यकता असून या योजने मधून हे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत.