पालघर : राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन‘. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावानं आपलं रक्षण करावं ही यामागची मंगल मनोकामना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधून त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. श्रावणात येणारा रक्षाबंधन हा सण भारताच्या अनेक भागांमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. हा सण आता जवळ येऊ लागल्यानं सर्वच बहिणींची पावलं राख्या घेण्यासाठी बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. अशातच पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या टेटवाली गावातल्या महिला या सध्या दिवस रात्र काम करून अतिशय सुबक आणि अतिशय बारीक काम, रंगसंगती आणि नक्षीकाम असलेल्या बाबूंच्या राख्या बनवण्यात व्यस्त आहेत.
रक्षाबंधनला अवघे दोन दिवस शिल्लक असून बाजारात निरनिराळ्या प्रकारच्या आकर्षक अशा राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये चायनीज राख्यांकडे ग्राहक पाठ फिरवत असून भारतीय बनावटीच्या राख्यांना पसंती देत आहेत. त्यातही काही प्रमाणात महाग असल्या तरी सुद्धा पर्यावरण पूरक राख्यांकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. हीच मागणी लक्षात घेता मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड मधल्या महिला बचत गटानं बांबू पासून पर्यावरणपूरक अशा राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांना सुद्धा महाराष्ट्रासह देशभरातून चांगली मागणी येत असून यंदा भारताच्या सीमेवरील जवानांच्या हातावर सुद्धा पालघर मधल्या आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या राख्या झळकणार आहेत. या राख्यांमूळे विक्रमगड सारख्या दुर्गम भागातल्या महिलांच्या हाताला घरबसल्या काम मिळाल असून याच माध्यमातून इथल्या महिला आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी मजबूत करत आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण दुर्गम भागात बेरोजगारीचं मोठ प्रमाण असून रोजगारासाठी इथले अनेक कुटुंब मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होतात. स्थानिक पातळीवर इथल्या बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यास इथले बरेचसे प्रश्न हे मार्गी लागतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केशव सृष्टी या संस्थेनं विक्रमगड मधल्या टेटवाली सह परिसरातल्या इतर गावांमधल्या निरक्षर आणि कमी शिक्षण असलेल्या महिलांना बांबूपासून राख्या बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. या भागात बांबू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून याच बांबूं पासून इथल्या महिलांना गावातचं रोजगाराची संधी केशव सृष्टी आणि नाबार्ड यांनी उपलब्ध करून दिली आहे. टेटवाली इथल्या बांबू हस्तकला महिला बचत गटात गावातल्या जवळपास ४० महिला काम करतात. या महिलांनी यंदा तब्बल 48 हजार पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती केली आहे. सुबक आणि आकर्षक दिसणाऱ्या या राख्यांसाठी बांबू, दोरा, फेविकॉल, कलर, मणी, वॉर्निश आदी साहित्य लागत असून एका राखीसाठी जवळपास 13 ते 15 रुपयांचा खर्च येतोय. या राख्या बाजारपेठेत 25 ते 30 रुपयांपर्यंत विकल्या जात असून प्रत्येक राखी मागे या महिला बचत गटाला 15 ते 17 रुपयापर्यंत नफा मिळतोय.
यंदा विक्रमडच्या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या बांबूच्या राख्या या त्यांनी विविध प्रतिनिधींच्या माध्यमातून सीमेवरील जवानांसाठी पाठवल्या आहेत. लडाख, सियाचिन, कच्छ , भुज इथल्या जवानांसाठी जवळपास १० हजार राख्या पाठवण्यात आल्या आहेत. तसचं नुकत्याच या महिला भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांना पर्यावरणपूरक अशा या बांबूच्या राख्या बांधून आल्या आहेत. आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या माध्यमातून १५०० राख्या भारतीय जवानांसाठी पाठवल्या आहेत. आतापर्यंत या महिलांनी साडे अकरा हजार राख्या भारतीय जवानांसाठी पाठवल्या आहेत.
टेटवाली महिला बचत गटाप्रमाणेच विक्रमगड मधल्या दुर्गम भागातल्या अडीचशे पेक्षा जास्त महिलांनी केशव सृष्टी आणि नाबार्डच्या माध्यमातून राख्या तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. एकट्या विक्रमगड तालुक्यातून 48 हजार राख्या महाराष्ट्रासह विविध भागांत विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. घराशेजारीच रोजगार निर्माण झाल्यानं इथल्या महिलांना आता घर सोडून रोजगारासाठी शहरांकडे जावं लागत नसल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.
पालघरच्या जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यानं इथली अनेक कुटुंब ही रोजगारासाठी स्थलांतरित होतात. मात्र गेल्या चार वर्षांपूर्वी केशव सृष्टी आणि नाबार्डनं दिलेल्या हस्तकलेच्या प्रशिक्षणानंतर या स्थलांतरात मोठी घट झाली आहे. टेटवालीसह परिसरातल्या गावांमध्ये मागील काळात 70 ते 80 टक्के कुटुंब ही रोजगारासाठी स्थलांतरित होत होती. मात्र आता हे स्थलांतराचं प्रमाण 20 ते 30 टक्क्यांवर आलं आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्यानं स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
चायना राख्यांना सध्या देशात फारशी पसंती मिळत नसून ग्रामीण भागात तयार होणाऱ्या अशा हस्तकलेच्या राख्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी येत आहे. त्यातही बांबू पासून तयार केलेल्या राख्या ह्या अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक असल्यानं या राख्यांच्या मागणीत दरवर्षी मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. बांबूंपासून तयार केल्या जाणा-या या राख्यांमुळे पर्यावरणाचा समतोल ही राखला जात आहे. दुर्गम भागातल्या महिलांना अगदी घराशेजारीच रोजगार उपलब्ध होत असला तरी आता शासनानं यात या महिलांना मदत करून त्यांना आणखी सुविधा पुरवल्यास या भागातल्या अनेक कुटुंबाचं स्थलांतर रोखण्यात नक्कीच मदत होईल यात शंका नाही.