पालघर : नजीकच्या भविष्यात भू-राजकीय, भू-आर्थिक तसचं भू-सांस्कृतिक राजकारणाचं महत्त्व वाढणार असून परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये शिक्षण तज्ञांचा समावेश आणि भूमिका महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. संजय देशपांडे यांनी केलं.
रशियन सरकारचे शिक्षण आणि विज्ञान खाते, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर ह्युमॅनिटीज मॉस्को, स्मार्ट सिव्हिलायझेशन एनजीओ, मॉस्को, रशियन हाऊस, मुंबई, मध्य युरेशिया अभ्यास केंद्र, मुंबई विद्यापीठ, राज्यशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर, विवेक वाणिज्य महाविद्यालय, मुंबई आणि शैलेंद्र महाविद्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विद्यापीठे आणि सार्वजनिक प्रकल्प यांच्या संदर्भात भारत-रशिया मधील भविष्यकालीन द्विपक्षीय सहकार्य’ या विषयावर मुंबई विद्यापीठातल्या मध्य युरेशिया अभ्यासकेंद्रात आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होत.
या चर्चासत्रात रशियातील विविध विद्यापीठांचे तज्ञ प्राध्यापक, बिगर शासकीय संस्थेचे विविध पदाधिकारी, आंतरराष्ट्रीय संबंधांचे विश्लेषक तसचं सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, विवेक महाविद्यालय आणि शैलेंद्र महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिव्हिलायझेशन या संस्थेच्या प्रमुख मरीने वस्कन्यान यांनी आपली संस्था जगभरामध्ये देशा-देशातील संबंध दृढ करण्यासाठी कसं कार्य करते याची माहिती उपस्थितांना दिली. या परिषदेत झालेल्या चर्चेत रशियन अभ्यासकांनी अर्थव्यवस्थेतलं चतुर्थ क्षेत्र म्हणजे ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. आणि त्यासाठी विद्यार्थी आणि बिगर शासकीय संस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण राहील, असे मत मांडले गेल. भारत-रशिया संबंध दृढ करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर भारतीय-रशियन विद्यार्थ्यांमध्ये मैत्री दिवस, एनजीओ स्तरावर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम, मानवतावादी उपक्रम राबवता येतील आदी विषयांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
झपाट्याने बदलत चाललेल्या जागतिक राजकारणामध्ये भारत-रशियामधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत असं प्रतिपादन रशियन हाऊस, मुंबईच्या संचालक डॉ. एलिना रेमिझोवा यांनी यावेळी केलं.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) तानाजी पोळ, महाविद्यालयातील १० प्राध्यापक आणि १५ विद्यार्थी यांनी चर्चासत्रात परस्पर संवादात सहभाग घेतला. तसचं सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सीए सचिन कोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका ऋतुजा राऊत यांनी केलं. तसचं विवेक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विजेथा शेट्टी, शैलेंद्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती पितळे यांची विशेष उपस्थिती होती.