पालघर / नीता चौरे : घराघरात शुध्द आणि सुरक्षित पिण्याचं पाणी पुरविण्यात यावं या उद्दिष्टातून जल दिवाळी – महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला हे अभियान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे देशभरात सुरु करण्यात आलं आहे. या अभियानाव्दारे जलप्रशासनाच्या यंत्रणेत महिलांचा समावेश करण्यात येत आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) या प्रमुख योजनेअंतर्गत ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) देखील सहभागी आहे. जलदिवाळी या मोहिमेचं उद्दिष्ट 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये महिला बचत गटांच्या जल प्रशासन यंत्रणेला भेटी देणं हे आहे.
याच जलदिवाळी मोहीमे अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातल्या काही बचत गटांच्या महिलांनी वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातल्या धुकटन या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांला भेट दिली. यावेळी महिलांना या जलशुद्धीकरण केंद्रातून त्यांच्या घरात कशा प्रकारे स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे डेप्युटी इंजीनियर सुरेंद्र ठाकरे यांनी उपस्थित बचत गटाच्या महिलांना त्यांच्या घरात येणारं पाणी या जलशुद्धीकरण केंद्रात कशा प्रकारे शुद्ध केलं जातं, त्यावर कोण कोणत्या प्रक्रिया केल्या जातात, पाण्याच्या गुणवत्तेची चाचणी कशी केली जाते या बाबत सविस्तर माहिती प्रत्यक्ष भेटी द्वारे समजावून सांगितली.
जल दिवाळी या मोहीमे अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या बचत गटांच्या महिलांना धुकटन इथल्या वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणा-या जलशुद्धीकरण केंद्राची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष समजावण्यात आली. या महिलांनी ही मोठ्या उत्साहाने आपल्या शंका आणि प्रश्नांची उत्तर जाणुन घेत जलशुद्धीकरणासाठी करण्यात येणा-या विविध प्रक्रिया जाणुन घेतल्या. यावेळी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागाच्या शहर विभाग व्यवस्थापक रुपाली कदम यांनी देखील आपल्या जीवनात शुद्ध पाण्याचं असलेलं महत्व महिलांना समजावून सांगितलं.
भारता सारख्या देशात घरगुती पाणी व्यवस्थापनात महिलांचा मोठा वाटा आहे. अशा परिस्थितीत महिलांना पाण्याशी संबंधित योग्य माहिती असणे आवश्यक आहे. महिलांसाठी पाणी, पाण्यासाठी महिला या थीमवर आधारित गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या जलदिवाळी मोहिमेमुळे महिलांना पिण्याच्या पाण्याच्या प्लांट पासून ते घरापर्यंत शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचं पाणी पुरविण्याची प्रक्रिया जाणून घेण्यास मदत होईल. याद्वारे त्यांना पाण्याची गुणवत्ता देखील समजू शकेल, ज्यामुळे प्रत्येक घरात दर्जेदार पाण्याची उपलब्धता सुनिश्चित होईल. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 15,000 पेक्षा जास्त बचत गटातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.