पालघर : शेतक-यांनी आपली शेती ओलिताखाली येण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात श्रमदानातून वनराई बंधारे बंधावेत असं आवाहन ठाणे कोकण विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी शेतक-यांना केलं. कृषि सहसंचालक अंकुश माने हे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्याच्या दौ-यावर आले होते. त्यावेळी शेतक-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या दौ-या दरम्यान कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी वाडा तालूक्या मधल्या पालसई इथं राहणा-या प्रगतशील शेतकरी किरण गोपाळ पाटील यांच्या शेतीला भेट देवून त्यांच्याशी आणि इतर शेतक-यांशी बातचीत केली. दरम्यान त्यांनी किरण पाटील यांच्या प्रक्षेत्रावर राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण बाबीचा अवलंब केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत गट स्थापनेविषयी सविस्तर चर्चा केली. आणि सोबतच मार्गदर्शन देखील केलं.
त्यानंतर त्यांनी वाडा तालुका कृषि अधिकारी सुनिल पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोशेरी इथं म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत करण्यात आलेल्या आंबा लागवडीची पाहणी केली. तसचं त्यानंतर त्यांनी लोक सहभागातून तयार करण्यात आलेला वनराई बंधा-याची देखील पाहणी केली. यावेळी त्यांनी शेत-यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की, वनराई बंधारे बांधल्यास आपल्या शेतात ते बागायती प्रकारची शेती करून त्यात भाजीपाला लागवड करू शकतात, त्याचबरोबर रब्बी पिकं घेवू शकतात. त्यामुळे शेतक –याचं आर्थिक उत्पन्न देखील वाढण्यास मदत होवू शकेल.
यावेळी वाडा तालुका कृषि अधिकारी सुनिल पारधी, वाडा उपविभागीय कृषि अधिकारी गावडे, मंडळ कृषी अधिकारी अहिरे, कृषी पर्यवेक्षक घरत, एस.आर.पाटील, कृषी सहाय्यक भोईर, इतर कर्मचारी, शेतकरी आदी उपस्थित होते.