पालघर : पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैतरना नदीत हत्या करून फेकलेल्या व्यक्तीच्याहत्या-यांना ४८ तासांत अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या घटनेत मुंबईतील टिटवाळा इथं राहणा-या तीन आरोपींना अटक केली आहे. हे तीन ही आरोपी मुळचे तेलंगणा राज्यातले रहिवासी आहेत.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटिल यांनी माहिती देताना सांगितलं की, मृत व्यक्तीचं शव मिळालं होतं ज्याच्या डाव्या हातावर राणा राजपूत आणि उजव्या हातावर आई-बाबा असं नाव गोंदलेलं होतं. शव मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने आणि पोलिसांनी मिळून तपास सुरु केला. तपासात मृत व्यक्ती हा कल्याण भागात रेल्वे स्टेशनवर या आरोपीं सोबत पाणी बॉटल विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. हा व्यक्ती आरोपींकडून दर महिन्याला पैसे घ्यायचा. त्यानुसार घटनेच्या दिवशी ही मृत व्यक्ती आरोपींकड़े पैसे घेण्यासाठी टिटवाळा त्यांच्या राहत्या घरी गेला असताना आरोपींनी त्याला दारू पाजुन घरातच लोखंडी पाईपने मारून बेशुद्ध केलं. आणि मग त्याला मारुती डिझायर गाडी मध्ये टाकुन खडवली मार्गे कसारा घाटातून खोडाळा रोडवरील कोरेगाव शिवारातील वैतरना नदीच्या पुलावर आणून पुन्हा त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावर दगड मारून तसच छातीवर आणि पोटावर जागोजागी सु-याने वार करून त्याची हत्या केली. आणि त्यानंतर त्याला १२५ फुट उंचीवरून खाली फेकून दिले. आणि हे सर्व आरोपी तिथून फरार झाले. पोलिसांनी या तीन ही आरोपींना हैद्राबाद इथून ताब्यात घेतलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता या हत्येमागचं कारण समोर आलं.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल विभुते यांनी त्यांच्या टीम सह ४८ तासांत आरोपींना अटक केली.