पालघर : महाराष्ट्र सागरी मंडळाकडून पालघर जिल्ह्यातल्या वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. वसई-भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या या रो-रो फेरीबोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत. मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीला ही रो-रो फेरीबोट सेवा चालविण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळानं परवानगी दिली आहे. एका फेरीत जवळपास १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची या फेरीबोटीची क्षमता आहे. या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे हि महाराष्ट्र सागरी मंडळानं केली आहेत.
पहा व्हिडीओ …….
सध्या महाराष्ट्र सागरी मंडळानं वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर हि रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज पासून हि सेवा नागरीकांसाठी सुरु करण्यात आली आहे. दररोज ही रो-रो सेवा सकाळी पावणे सात ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत दिली जाणार आहे. भरतीच्या वेळी कमी अंतराच्या पूर्वी निश्चित केलेल्या ०.८ सागरी मैल अंतर असलेल्या मार्गाचा वापर होणार असल्यानं प्रवासासाठी कमी वेळ लागेल. मात्र ओहोटीच्या वेळी २ सागरी मैल अंतराच्या मार्गाचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळे प्रवासासाठी थोडा जास्त वेळ लागू शकेल.
ह्या फेरी बोटीचे सुरक्षित आणि सुलभ नौकानयन, जेट्टी आणि बोटीमधून प्रवासी तसचं वाहनांची सुलभ चढ-उतार, सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येईल. सध्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर वसई ते भाईंदर या फेरीबोट सेवेसाठी तिकीट दर आकारले जाणार आहेत.
हेही वाचा : शार्कने तरुणावर केला जीवघेणा हल्ला
सध्या ही फेरीबोट सेवा जरी प्रायोगिक तत्त्वावर सुरु होणार असली तरी, वाहतूककोंडीचा सामना करत वसई ते भाईंदर असा रस्त्यानं प्रवास करणा-या लोकांना वेळ आणि इंधनाची बचत करणारा, प्रदूषण मुक्त, पर्यावरण स्नेही आणि आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्यानं जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला आहे.
सध्या वसई भाईंदर या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलची गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हि रोरो सेवा सुरू झाल्यानं या भागातल्या प्रवाशांना आता अवघ्या काही मिनिटातच फेरीबोटीनं वसई-भाईंदर असा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरु झालेल्या या रो-रो सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल.