पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पच्छिम रेल्वे अंतर्गत येणाऱ्या पालघर रेल्वे स्थानकाच्या विकासकामाचं भूमिपूजन संपन्न झालं. या कार्यक्रमाला पालघरचे खासदार राजेंद्र गावित, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालघर रेल्वे स्टेशन परिसरात आज भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, रेल्वेचे अधिकारी आणि नागरिक आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
याप्रसंगी आपलं मत व्यक्त करताना पालघरचे खासदार राजेंद्र गावित म्हणाले कि, रेल्वे हि इथल्या लोकांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पालघर स्टेशनचं आधुनिकीकरण झाल्यानंतर त्याचा फायदा नक्कीच लोकांना होईल. आता पालघर रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार असून वसई आणि विरार स्टेशनला देखील जंक्शनचा दर्जा प्राप्त झाला आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत आता पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांसाठी मास्टर प्लॅन तयार करून सुविधांमध्ये वाढ करणे हा या योजनेचा उद्देश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पालघर रेल्वे स्थानक हे आता नव्या इमारतीसह अनेक सुविधांनी युक्त असं स्टेशन होणार आहे. यात एक विशाल रुफ प्लाझा असेल. ज्यात किरकोळ विक्रीसाठी जागा, कॅफेटेरिया, मनोरंजनाच्या सुविधा, मोफत वाय-फाय, वन स्टेशन वन प्रोडक्ट, पार्किंग सुविधा, वाहतुकीची इतर साधने आदी सर्व सेवा प्रवाश्यांना उपलब्ध होवू शकतील.
या योजनेच्या अंतर्गत देशभरात १३०९ रेल्वे स्थानकांना पुनर्विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी निवडलं गेलं आहे. ज्यात पश्चिम रेल्वेच्या १२२ स्थानकांचा समावेश आहे. या १२२ स्थानकांपैकी १६ स्थानके महाराष्ट्र, ८९ स्थानके गुजरात, १५ स्थानके मध्य प्रदेश आणि २ स्थानके राजस्थान मधील आहेत.
२६ फेब्रुवारी ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम रेल्वेच्या ६ डिव्हिजन्स मधील ६६ रेल्वे स्थानकांसहित देशभरातील ५५४ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचं भूमिपूजन व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलं. अंदाजे ४८८६ करोड रुपयांच्या खर्चातून पुनर्विकसीत केल्या जाणाऱ्या ६६ स्थानकांमध्ये ४६ स्थानके गुजरात राज्यातील, ११ स्थानके महाराष्ट्रातील आणि ९ स्थानके मध्य प्रदेश मधील आहेत.