पालघर : पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी भागातल्या पाड्यांवरील विदयार्थी- विद्यार्थिनींना, शालेय जीवनात खेळाचं प्राथमिक ज्ञान आणि कौशल्य अवगत होण्याच्या दृष्टीनं पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान तालुका निहाय आदिवासी शाळां मधल्या १० ते १४ वर्ष वयोगटातल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी टॅलेंट हंट हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अजित कुलकर्णी आणि त्यांची सपोर्ट टीम यांच्या माध्यमातून मुख्यत्वे मोखाडा, विक्रमगड, जव्हार, वाडा, तलासरी, पालघर आणि वसई ग्रामीण या भागातल्या २०० आदिवासी शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याची सुरवात विक्रमगड आणि वाडा या तालुक्यातून करण्यात आली आहे.
यात एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशनकडून प्रत्येक शाळेत २५,००० रुपयांचं क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स एक्सरसाईज चित्रफीती आदी देण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेतले ३० ते ४० विद्यार्थी निवडून या खेळाडूंना एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशन कडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडल्या गेलेल्या खेळाडूंची धाडस या नावाची स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यात रनिंगसाठी भरारी या नावाची रोड रेस घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातले हे आदिवासी पाडे मुख्य रस्त्यापासून आत जंगलात ५ ते ८ किमी दूर वर असल्यानं या स्पर्धेत विजयी होणाऱ्या खेळाडूंना एम्स स्पोर्ट्स फाऊंडेशनकडून बक्षीस म्हणून सायकली दिल्या जातील. त्यामुळे या उपक्रमाचा आदिवासी आणि डोंगरी भागातल्या शालेय विद्यार्थ्यांना फायदा होवू शकेल.