पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर जवळील मोठे कुडण गावात घडलेल्या भिमराव पाटील आणि मुकुंद पाटील या दोन वृद्धांच्या हत्याकांड प्रकरणातला आरोपी किशोरकुमार मंडल याला पोलिसांनी अटक केली असून या आरोपीला आज पालघर न्यायालयात हजर करण्यात आलं होत. त्यांनतर पालघर न्यायालयाने या आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितलं कि, बोईसर जवळील शिवाजीनगर भागात राहणारा ३० वर्षीय आरोपी किशोरकुमार मंडल हा तारापूर एमआयडीसी मधल्या आरती ड्रग्स कंपनीत नोकरी करत होता. मात्र घटनेच्या दोन दिवसां अगोदर घरात झालेल्या काही वादामुळे तो घर सोडून निघून गेला होता. आणि घटनेच्या दोन दिवसां आगोदर पासून तो मोठे कुडण गावात फिरत होता. त्याला असं गावात फिरताना पासून मृत मुकुंद पाटील यांनी त्याला एक दोन वेळा हटकलं होत. २९ फेब्रुवारीला घटनेच्या दिवशी ९२ वर्षीय मृत मुकुंद पाटील हे त्यांच्या चिकूच्या वाडीत संध्याकाळच्या वेळी फेर फटका मारायला जात असताना त्यांनी पुन्हा या आरोपीला हटकलं. आणि त्यावेळी आरोपी आणि मयत मुकुंद पाटील यांच्यात वाद झाला. या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपी किशोरकुमारने मयत मुकुंद पाटील या वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर कुदळीने वार करून त्यांची हत्या केली. अंधार पडला तरी सुद्धा मुकुंद पाटील घरी न आल्याने त्यांचे भाऊ ८४ वर्षीय भीमराव पाटील हे त्यांना पाहण्यासाठी गेले. तेव्हा आरोपीने त्यांच्या हि डोक्यावर मागून कुदळीने वार करून त्यांची देखील हत्या केली. आरोपीने दोन्ही वृद्धांच्या डोक्यावर इतक्या क्रुरतेनं वार करून त्यांची हत्या केली होती की, त्यांच्या डोक्याचे भाग अगदी छिन्नविछिन्न झाले होते. आणि त्यांनतर तो तिथून फरार झाला.
घटनेची माहिती मिळाताच बोईसरचे उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि ग्रामस्थ, पोलीस यांची वेगवेगळी पथक तयार करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. दरम्यान जंगलाचा बराच शोध घेतल्यानंतर खाडीच्या दिशेने शोध घेत असताना आरोपी हा जवळच्या तलावाच्या दलदलीत लपून बसला असल्याच लक्षात येताच सहायक पोलीस निरीक्षक सतीश आस्वर यांनी उडी मारून त्याला पकडलं. ग्रामस्थ आणि टीमच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान आरोपीच्या नाका तोंडात चिखल गेला असल्यानं आणि त्यांच्या अंगावरहि जखमा असल्याने त्याला तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
त्यानंतर आज आरोपीला पालघर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी किशोरकुमार हा मुळचा बिहार राज्यातल्या कटिहार जिल्ह्या मधल्या शब्दा पोठीया इथला राहणारा आहे.