पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसईत असलेल्या ऐतिहासिक वसई किल्ल्यात आता संध्याकाळी सात नंतर प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. यासाठी किल्ल्यासभोवताली संरक्षक जाळ्यांचं कुंपण लावण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे किल्ल्याच्या परिसरात ४५० मीटर पर्यंत या संरक्षक जाळ्या लावण्यात येत आहेत. या जाळ्या लावल्यानंतर संध्याकाळी ७ नंतर किल्ल्यात प्रवेश बंदी घातली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
इथं दररोज मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. या किल्ल्याच्या चारही बाजूने संरक्षण नाही. त्यामुळे किल्ल्यावर रात्री येणाऱ्या मद्यपी पर्यटकांवर कोणतीही बंधने नसल्यानं ते सर्रासपणे किल्ल्यात प्रवेश करतात. यामुळे किल्ल्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वसईचा किल्ला हा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी तसचं किल्ला अधिक सुरक्षित करण्यासाठी पुरातत्त्व विभागानं या भागात संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे.