पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात दरवर्षी प्रमाणे यंदा १४ ते २० एप्रिल या कालावधीत ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या कालावधीत अग्निशमन विभागाकडून महानगरपालिकेच्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रातल्या निश्चित केलेल्या ठिकाणी अग्निशमन वाहने आणि साहित्यासह प्रात्यक्षिके, पथनाट्यासह जनजागृती, शुरविर हुतात्म्यांना श्रध्दांजली, बाबासाहेब आंबेडकर जयंती वंदन, अग्निशमन आणि जीवन संरक्षण साहित्य प्रदर्शन, अग्निशमन विभागातील फायर इंजिनसह वाहनांची रॅली, अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व धोके, रस्ते दूर्घटना आपत्ती व धोके, लिफ्ट दूर्घटना आपत्ती व धोके, प्रथमोपचार आणि आरोग्य विषयक माहिती, आग प्रतिबंधक व जिवसंरक्षक उपाय योजना या विषयावर मार्गदर्शन आणि कार्यशाळा यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
१४ एप्रिल, १९४४ मध्ये मुंबई गोदीत एस.एस.फोर्ट स्टिकिंग या जहाजाचा स्फोट होवून लागलेल्या भीषण आगीशी झुंज देताना अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं होत. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येतो.