पालघर : डेंग्यू हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे. १६ मे हा दिवस “राष्ट्रीय डेंग्यू दिवस” ( National Dengue Day ) म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि साथरोग अधिकारी यांनी डेंग्यू आजाराबाबत नियोजन करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची सभा घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं. तसचं वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत आपल्या स्तरावर राज्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य कर्मचारी, ए.एन.एम, आशा आणि औषध फवारणी कर्मचारी यांच्याकडून जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. तर अनेक ठिकाणी डेंग्यूबाबत गटसभा आयोजित करून माहिती देण्यात आली.
तसचं नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर डेंग्यूची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या संबंधी प्रदर्शन भरवून आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांचं आणि स्पर्धांचं आयोजन करून डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.