पालघर : देशाच्या गतीला तिपटीने वाढवण्यासाठी तसचं देशाच्या अर्थव्यवस्थेला तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी ही निवडणूक आहे असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. पालघर जिल्ह्यातल्या वसई मधल्या सनसिटी मैदानावर आज भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ.हेमंत सवरा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे खासदार राजेंद्र गावित हे देखील उपस्थित होते.
यावेळी प्रचार सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, सर्जिकल स्ट्राईक करून आतंकवाद्यांना नष्ट करण्याचं काम मोदींनी केलं आहे, मोदींनी ३७० समाप्त केलं, महिलांना आरक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. पण ही काम हे लोक करू शकतात का, हे लोक देशाल सुरक्षित ठेवू शकतात का, हे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देवू शकतात का असा सवाल यावेळी शहा यांनी उपस्थित जनतेला केला. जेएनपीटी, वंदेभारत ट्रेन, अटल सेतू, रेल्वे स्थानकांच्या कायापालट करण्याचं काम, आणि इतर अनेक विकास कामं करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आहे , त्यामुळे भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांना निवडून देवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याचं काम आपल्याला करायचं आहे असं आवाहन यावेळी शहा यांनी उपस्थित जनतेला केलं.
यावेळी या प्रचार सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पूर्वीचा भारत मजबूर भारत होता मात्र आताचा भारत हा मजबूत भारत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला, तरुण, युवा, शेतकरी यांच्या जीवनात आनंद आणण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मोदी आणि शहा हे देशाला लाभलेले दोन रत्न आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.